
कुडाळ : मराठी भाषा, मराठी शाळा, मराठी संस्कृती, मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी विचारजागर व कार्यकर्ता संघटन घडविण्याच्या उद्देशाने मराठी अभ्यास केंद्रातर्फे ‘महाराष्ट्रधर्म शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार, २६ जुलै रोजी दुपारी ४ ते ७ या वेळेत मराठा समाज हॉल, कुडाळ येथे होणार आहे.
शिबिरात मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार तसेच भाषा सल्लागार समितीचे सदस्य डॉ. प्रकाश परब हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. मराठी भाषा, शिक्षण, संस्कृती आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासंदर्भातील विविध विषयांवर ते आपले विचार मांडणार आहेत. याशिवाय निवडक कार्यकर्त्यांची मनोगते आणि उपस्थितांसोबत खुले प्रश्नोत्तर सत्रही आयोजित करण्यात आले आहे. कोकणातील मराठी भाषा आणि महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांनी या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी साधना गोरे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मराठी अभ्यास केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे.











