LIVE UPDATES

नांदगावात ‘सिंधू जनसंवाद आरोग्य यात्रे’चा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

ग्रामीण व दुर्गम भागांतील नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्यावर भर ; आरोग्य यंत्रणेने जनतेपर्यंत पोहोचावे : नितेश राणे
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 15, 2026 14:08 PM
views 33  views
#kokansadlive#news update#konkan update#

कणकवली : कणकवली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, नांदगाव येथे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते ‘सिंधू जनसंवाद आरोग्य यात्रे’चा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सुमारे ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून आरोग्य यात्रा राबविण्यात येणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती आणि काही भागांतील दुर्गमता लक्षात घेता ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविणे हे मोठे आव्हान आहे. दुर्गम भागांमध्ये डॉक्टरांची उपलब्धता, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका पोहोचणे तसेच नेटवर्कच्या समस्या अशा विविध अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे नागरिकांना आरोग्यसेवा मिळविण्यासाठी अनेकदा अडचणी येतात. अशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणेने नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना सेवा देणे महत्त्वाचे असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

नागरिकांनी आरोग्यसेवेसाठी यंत्रणेपर्यंत येण्याऐवजी आरोग्य यंत्रणेने नागरिकांपर्यंत पोहोचणे ही कौतुकास्पद बाब आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागांतील नागरिकांना आरोग्यसेवेचा लाभ मिळावा, यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे. या आरोग्य यात्रेमुळे नागरिकांना दिलासा मिळेल, असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. या संकल्पनेला राज्याचे आरोग्यमंत्री अमितजी यांनीही पसंती दर्शविली असून, महाराष्ट्रातील इतर भागांतही अशा प्रकारचा उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने विचार सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

जिल्ह्यातच दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्याही रुग्णाला उपचारांसाठी कोल्हापूर किंवा गोवा येथे जाण्याची वेळ येऊ नये, तर जिल्ह्यातच दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, हा दृष्टिकोन ठेवून सर्वांनी काम करणे आवश्यक आहे, असे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील रुग्णांना योग्य निदान आणि आवश्यक उपचार स्थानिक पातळीवरच मिळावेत, यासाठी शासन आणि जिल्हा परिषद आरोग्य विभाग सातत्याने प्रयत्नशील आहेत. आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी आणि डॉक्टरांची कमतरता दूर करणे, जिल्ह्यात उपलब्ध नसलेल्या उपचार सुविधा सुरू करणे तसेच आरोग्यसेवेचा दर्जा उंचावणे यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी सातत्याने समन्वय साधला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

काही नागरिकांना आरोग्य शिबिरांपर्यंत पोहोचणे शक्य होत नाही. अशा नागरिकांपर्यंत आरोग्य यंत्रणेने स्वतः पोहोचण्याची गरज आहे. त्यासाठी मोबाईल आरोग्य युनिटच्या माध्यमातून दुर्गम भागांतील नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करणे, नागरिकांना चांगल्या दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणे आणि जिल्ह्यातच आवश्यक उपचार मिळण्याची व्यवस्था निर्माण करणे, हे आपले उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. या उपक्रमाच्या आयोजनाबद्दल जिल्हा परिषद आरोग्य विभाग, पदाधिकारी, अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे त्यांनी अभिनंदन केले.

यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा बासूर, आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, समाज कल्याण सभापती रूहीता तांबे, जिल्हा परिषद सदस्य शीतल दळवी, सुप्रिया मेस्त्री, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, जिल्हा शल्यचिकित्सक श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, डॉ. सुबोध इंगळे, तालुका आरोग्य अधिकारी पूजा काळगे, सभापती हर्षदा वाळके, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सरपंच रविराज मोरजकर, पांढरी वायंगणकर, डॉ. पंकज पाटील, उपसभापती राजेश उर्फ सोनू सावंत आदी उपस्थित होते.