LIVE UPDATES

शेवरे-तांबळवाडी येथे ‘खेत बचाव अभियान’ उत्साहात

शेतकऱ्यांना मार्गदर्शन
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 18, 2026 21:06 PM
views 33  views

देवगड : देवगड तालुक्यातील शेवरे-तांबळवाडी येथे कृषी विभाग, आत्मा नैसर्गिक शेतीशाळा आणि कृषि विज्ञान केंद्र, किर्लोस (सिंधुदुर्ग) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला ‘खेत बचाव अभियान’ कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला परिसरातील शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

१७ जून रोजी आयोजित या कार्यक्रमात कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. सुशांत राणे यांनी ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर शिवार फेरी, कृषी यांत्रिकीकरण तसेच बदलत्या हवामानातील शेती व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले.

यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी, कणकवली उमाकांत पाटील यांनी भात पिकाच्या रोपवाटिका व्यवस्थापन, एसआरआय (SRI) पद्धतीने भात लागवड तसेच ‘मागेल त्याला काजू कलमे’ या योजनेबाबत माहिती दिली.

तालुका कृषी अधिकारी आरती पाटील यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी ‘अॅग्रीस्टॅक’ अंतर्गत फार्मर्स आयडी काढून घ्यावी, असे आवाहन केले. तसेच जैविक आच्छादन आणि फळबागांचे उन्हापासून संरक्षण याविषयी प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले.

उपकृषी अधिकारी डॉ. बी. एम. लांबाडे यांनी नैसर्गिक शेती, गोकृपा अमृत आणि बायोचार याविषयी सविस्तर माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आत्मा बीटीएम देवगडचे निकेतन राणे यांनी केले, तर उपस्थितांचे आभारही त्यांनी मानले. यावेळी कृषी सेवक प्रवीण हनवते, सहाय्यक कृषी अधिकारी सचिन पडघन, कृषी सेवक मंगेश घनमोडे यांच्यासह तांबळवाडी परिसरातील महिला व पुरुष शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.