LIVE UPDATES

कुणकवणमध्ये ‘जल अर्पण महोत्सव’ उत्साहात

जलसंवर्धन, पाणी बचत व गुणवत्तेबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 23, 2026 18:45 PM
views 20  views
#kokansadlive#news update#konkan update#

देवगड :  जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामपंचायत कुणकवण येथे ‘जल अर्पण महोत्सव’ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जलसंवर्धन, पाणी बचत, पाणी गुणवत्ता तसेच जल जीवन मिशनच्या उद्दिष्टांबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात आली.

जल जीवन मिशनच्या माध्यमातून गावातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासोबतच ग्रामपंचायत, ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समिती, स्वयंसहाय्यता गट तसेच ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कुणकवणच्या सरपंच वैशाली पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपसरपंच आनंद ठाकुरदेसाई आणि शाखा अभियंता संदीप पोवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी निलेश पाताडे, ग्रामपंचायत सदस्य मंगेश गुरव, सुषमा जनक, रुपाली पाटणकर, मिनाक्षी गोरूले, माऊली चव्हाण महाराज, अंगणवाडी सेविका, गटसमन्वयक वैशाली मेस्त्री, पाणी समन्वयक हर्षदा बोथीकर, विद्यार्थी, बचतगट प्रतिनिधी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जल अर्पण महोत्सवानिमित्त गावातून जलदिंडी काढण्यात आली. यावेळी पाणी बचत, जलसंवर्धन आणि पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच जलबंधन, पाणी गुणवत्तेबाबत मार्गदर्शन आणि जलसंकल्प शपथ असे विविध उपक्रम राबविण्यात आले.

ग्रामस्थांना शुद्ध व सुरक्षित पाणी उपलब्ध करून देण्याबरोबरच गावातील जलस्रोतांचे संवर्धन व संरक्षण करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन विनायक धुरी यांनी केले, तर आभार ग्रामपंचायत अधिकारी निलेश पाताडे यांनी मानले.