घोरणे कशामुळे होते? | घोरणे बंद करण्यासाठी उपाय

Edited by: ब्युरो
Published on: October 09, 2023 11:14 AM
views 3235  views

घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिबेला सूज येते. पडजीभ ही जिभेच्या मागच्या बाजूला, वरच्या बाजूने लोंबणारी, वरची बाजू ४-५ मि.मी. जाडीची व लांबी सुमारे २ सें.मी. व खालची बाजू टोकदार अशी साधारणतः त्रिकोणी आकाराची, स्नायूंची बनलेली असते. ज्यावेळी जीभ आत घेऊन 'आ' असा आवाज करतो तेव्हा इतर माणसांना ही पडजीभ नीट दिसते. तिच्या लोंबणाऱ्या टोकाला सूज येते. त्यामुळे तिची लांबी वाढते व ती झोपेत श्वसनमार्गात अडथळा निर्माण करते. त्यामुळे प्रत्येक उच्छवासाचे वेळी ती कंप पावते. त्यामुळे होणाऱ्या आवाजाला आपण घोरणे असे म्हणतो.

◼️आपण 'घोरतो आहोत' हे ज्याचे त्याला समजत नाही. पण घरातील इतरांना त्रास होतो, त्यांची झोपमोड होते. काहींना भीती वाटते. त्यामुळे कुटुंबियांकडून तक्रार आल्यास व्यक्तीने लगेच उपचार सुरू करावेत.

◼️अंगठ्याच्या टोकाला थोडी हळदपूड घेऊन, तोंड उघडून, त्यावेळी आंगठा तोंडात ठेवून ती हळदीची पूड पडजिभेला लावावी. हे काम दिवसातून दोन-तीन वेळा करावे. हळद जंतुनाशक व सूजनाशक असल्याने हळद लावण्याचा फायदा होतो.

◼️घशातील उष्णता कमी करण्यासाठी आपण घरात बनवतो ते साजूक तूप, मानेला बाहेरून चोळावे. रोज दोनदा. याने घशातील सूज कमी होते.

◼️प्राणायामातील कपालभाती करण्याने अनेक फायदे होतात.त्यांने सर्व श्वसनसंस्था निरोगी राहते.

◼️उशी न घेता झोपायची सवय करावी. सुरुवातीला २ इंच जाड उशी असेल तर हळुहळू तिची जाडी दीड इंच, नंतर एक इंच, अर्धा इंच अशी दर ८-१० दिवसांनी कमी-कमी करत जावे. म्हणजे त्या त्यावेळी शरीराची सवय बदलत जाते.

◼️शक्यतो कुशीवर झोपावे.

◼️झोपताना नाकात २-२ थेंब देसी गाईचे तूप घालावेत. याला नस्य असे म्हणतात. यावेळी मान जास्तीत जास्त मागे करून नाक काटकोनात यावे. म्हणजे टाकलेले तुपाचे थेंब नाकामागील पोकळीमध्ये जातात. त्याचवेळी ४-५ मिनिटे तरी त्याच स्थितीत रहावे. मग स्थितीबदल करावा.

◼️वजन वाढले की येणाऱ्या अनेक समस्यांमध्ये ही एक समस्या आहे. म्हणून शक्यतो वजन वाढू देऊ नये.

◼️झोपण्यापूर्वी अनेकांना विडी, सिगारेट, दारू पिणे याची सवय असते. पण याने उष्णता वाढत असल्याने घोरणे थांबवण्यासाठी या व्यसनांपासून दूर राहावे.