
कुडाळ : येथील सिंधू केअर हॉस्पिटलमध्ये (Sindhu Care Hospital) सावंतवाडी येथील एका ६१ वर्षीय महिलेच्या मेंदूवरील ट्यूमरची (Brain Tumor) यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. न्यूरो सर्जन डॉ. आनंद मुनघाटे यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली असून, यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील न्यूरोसर्जरीच्या सेवेला एक नवी दिशा मिळाली आहे.
सावंतवाडी येथील रहिवासी असलेल्या ६१ वर्षीय महिलेला गेल्या काही दिवसांपासून तीव्र डोकेदुखी आणि चालण्यास त्रास जाणवत होता. त्यांनी सिंधू केअर हॉस्पिटलमध्ये तपासणी केली असता, त्यांच्या मेंदूमध्ये ट्यूमर असल्याचे निदान झाले. न्यूरो सर्जन डॉ. आनंद मुनघाटे यांनी त्यांना तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला.
डॉक्टरांचा सल्ला मान्य करून रुग्णाच्या नातेवाईकांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. डॉ. आनंद मुनघाटे आणि सिंधू केअर हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमने अत्यंत कौशल्याने ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर असून, त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मोठा आधार:
सिंधू केअर हॉस्पिटलमध्ये न्यूरो सर्जन डॉ. आनंद मुनघाटे यांच्यासारखे तज्ज्ञ उपलब्ध झाल्यामुळे आता मेंदू आणि मणक्याच्या (Spine) विकारांवर उपचारासाठी जिल्ह्यातील रुग्णांना मुंबई किंवा पुणे अशा महानगरांमध्ये जाण्याची गरज राहिली नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ठिकाणीच अशा गंभीर शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडत असल्याने जिल्ह्यातील हजारो गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध झाली आहे.
या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल डॉक्टर मकरंद परुळेकर यांनी डॉ. आनंद मुनघाटे आणि सिंधू केअर हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत.