
सावंतवाडी : मालवण नगरपरिषदेच्या निवडणूक प्रचारा दरम्यान मालवणमधील एका भाजप पदाधिकाऱ्याच्या घरावर धाड टाकून आमदार निलेश राणे यांनी लाखो रुपयांची कॅश पकडली. पत्रकारांच्या माध्यमातून जनतेसमोर आणली त्यासाठी आभार आणि अभिनंदन करतो. चाल, चरित्र, चेहरा याची भाषा करणाऱ्या भाजपचा अवैध काळा चेहरा या निमित्ताने अक्षरशः उघडा पडला आहे. असं मत उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषदेंचा आणि नगरपंचायतीचा विकास करणार अशी आरोळी ठोकणाऱ्या भाजपचे सत्तापिपासू धोरण जनतेसमोर जणू उघड झालं आहे.प्रत्येक मतदाराला दहा ते पंधरा हजार रूपये वाटून कशीही सत्ता हडप करायची आणि मग ह्या नगरपरिषदेत भ्रष्टाचाराचा मोठा कारखाना चालू करायचा हेच भाजपचे धोरण आहे.
प्रत्येक नगरपरिषदेच्या निवडणुकीत वाटण्यासाठी प्रत्येकी पन्नास खोके वरून आले असल्याची जनतेत जोरदार चर्चा आहे.साम दाम दंड भेद ही निती वापरून निवडणूका जिंकण्याची भाजपची पध्दत गेली ११ वर्षे सर्व देशभर कुप्रसिद्ध आहेच पण आता बॅ नाथ पै आणि प्रा मधु दंडवते यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यावर त्याचे आक्रमण होताना दिसत आहे. एकीकडे ईव्हीएम सोबत असलेल्या व्हिव्हिपॅटला (VVPAT) सोयीस्कर रितीने बाजूला केलं आहे आणि आता अवकाळी पावसाने त्रस्त असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या हद्दीत मुसळधार पैशांचा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. विकास अशी कोल्हेकुई करणाऱ्यांचा एकतर्फी विजय आत्ताच जाहीर करण्यास काहीच हरकत नाही अशी दयनीय परिस्थिती निर्माण झाली आहे असं मत डॉ. परूळेकर यांनी व्यक्त केले.










