
माझी शेवटची निवडणूक
कणकवली : कणकवली नगरपंचायतीची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवू, असे सांगणारे आमचे प्रतिस्पर्धी आता पराभवाची चाहूल लागताच पैशांचे वाटप करू लागले आहेत. १० ते १५ हजार रुपये प्रति मतदार वाटले जात असल्याचा आरोप कणकवली शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांनी केला. कणकवलीची सुज्ञ जनता पैशाने विकली जाऊ शकत नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान ही माझी शेवटची निवडणूक असून मतदारांनी मला लोकसभेची एक संधी द्यावी असे भावनिक आवाहनही पारकर यांनी केले. तर निवडणुकीसाठी मला व आमच्या सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना नारळ हे शुभचिन्ह मिळाल्याचेही ते म्हणाले.
आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पारकर म्हणाले, आमचे प्रतिस्पर्धी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढविणार असल्याचे सांगत होते. मात्र त्यांच्याकडून मतदारांना पैसे वाटण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत. निलेश राणे यांनी माझ्या प्रचारार्थ कणकवलीत सभा घेतली, त्याला मिळालेला प्रतिसाद पाहून आमच्या प्रतिस्पर्ध्यांनी हे प्रकार सुरू केले आहेत. गेल्या आठ वर्षात सत्ताधाऱ्यांनी कणकवलीची लूट केली आणि त्यातील पैसा आता मतदारांना वाटला जात आहे. याप्रकरणी निवडणूक आयोगाकडेही तक्रार करणार असल्याचे पारकर म्हणाले. तर काही लोकांनी हे पैसे स्वीकारण्यास विरोधी केल्याचे त्यांनी सांगितले.
धनशक्ती विरुद्ध जनशक्ती
पारकर पुढे म्हणाले, सर्वपक्षीयांना एकत्र करून मी शहर विकास आघाडी स्थापन केली. त्यात मीच नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असल्याने कणकवलीत मतांची किंमत वाढली आहे. मात्र, माझी लढाई लोकशाही वाचविण्यासाठी आहे. पैसे वाटण्याचे प्रकार घडले तरी मी लढणारच आहे. कारण ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे. मात्र कणकवली भयमुक्त भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी माझी लढाई सुरू आहे.
माझी शेवटची निवडणूक
मी गेली 30 ते 35 वर्षात अनेक निवडणुका लढवल्या आहेत. यामध्ये अनेक जय - पराजय पाहिलेत. पण कणकवलीवासियांना मी आवाहन करतो की, ही माझी शेवटची निवडणूक आहे. मला परिवर्तनाची एक संधी द्या आणि गतवेळच्या सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात मला मतदान करा. कणकवलीवासीयांना अपेक्षित विकास मी करून दाखवेन, असेही पारकर म्हणाले.
ब्लू प्रिंट मतदारांसमोर ठेवणार
लवकरच कणकवलीच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट मी मतदारांसमोर ठेवणार आहे. यामध्ये सत्ता आल्यानंतर विकासाची दिशा कशी असणार? कणकवली शहरातील आरक्षणे विकसित कशी केली जाणार? क्रीडांगण, भाजी मार्केट, फुल मार्केट, मल्टीपर्पज हॉल आदींची उभारणी अशा बाबी असणार आहेत. मी नगराध्यक्ष होईन तेव्हा पुढील पाच वर्षात कणकवली शहराचा नियोजनबद्ध विकास केला जाईल, असेही पारकर म्हणाले.
तेव्हाचा विकास आजही सर्वांच्या स्मरणात
या कणकवली शहराचा मी दहा वर्षे सरपंच होतो. त्यानंतर कणकवलीचा पहिला नगराध्यक्ष झालो. सरपंच व नगराध्यक्ष या काळात मी केलेली कामे कणकवलीकर नागरिकांच्या आजही लक्षात आहेत. आता देखील रोजगार, पर्यटन अशा विविध माध्यमातून शहराचा शाश्वत विकास करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे पारकर म्हणाले.
पालकमंत्र्यांना झुकते माप द्यावेच लागेल
वास्तविक विकास कामांसाठी निधी देण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांची आहे. साहजिकच उद्या निवडून आल्यानंतर देखील मी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडे विकास निधीसाठी नक्कीच जाईन. त्यांनी निधी द्यायचा की नाही हा अर्थात त्यांचा प्रश्न असेल. वास्तविक जिल्ह्याचे पालकमंत्री हे कणकवलीचे आमदारही आहेत. सहाजिकच कणकवली शहराला त्यांनाही झुकते माप द्यावे लागणारच आहे, असेही पारकर म्हणाले.
लक्ष्मी घ्याच आणि परिवर्तनाला साथ द्या
आमच्या प्रतिस्पर्ध्यांकडून मतदारांना पैसे वाटले जात आहे. वास्तविक पैसा ही लक्ष्मी आहे. त्यामुळे त्यांचे पैसे जरूर घ्या. पण जे करायचे आहे तेच करा आणि सत्ता परिवर्तनाला साथ द्या, असेही पारकर म्हणाले.










