
मुंबई : विषारी कफ सिरपमुळे देशभरात १८ चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. यात नागपूरच्या रुग्णालयात झालेल्या १८ महिन्यांच्या मुलीचाही त्यात समावेश आहे. त्यामुळे प्रशासन खळबळून जागं झालं आहे. यासंदर्भात अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. अशातच आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय सिरप प्रवर्गातील औषधी देऊ नये, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन विभागाकडून देण्यात आले आहेत. त्यामु्ळे अशा औषधांसाठी आता डॉक्टरांचा प्रिस्क्रिप्शन लागणार आहे.
राज्य अन्न व औषध प्रशासन विभागाकडून सर्व किरकोळ औषधी विक्रेत्यांना यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. कफ सिरपमुळे मध्यप्रदेशातील बालकांच्या झालेल्या मृत्यूनंतर हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. बाल रुग्णांसाठी 'सिरप' प्रवर्गातील औषधे डॉक्टरांच्या चिट्ठीशिवाय विक्री केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही अन्न व औषध विभागाकडून देण्यात आला आहे.
औषधे व सौंदर्य प्रसाधने नियम १९४५ अंतर्गत अनुसूची एच,अनुसूची एच-1 आणि अनुसूची एक्स या औषधांची विक्री डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन करु नये असे निर्देश आहेत. हाच नियम आता सिरप प्रवर्गातील औषधांनाही लागू करण्यात आला आहे. त्यामुळे आता कफ सिरप प्रर्वगातील कोणताही डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही.
दरम्यान, कप सिरपमुळे देशभरात आतापर्यंत १८ चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. या विषारी कफ सिरपमुळे चिमुकल्यांची किडनी निकामी होऊन मेंदूवर सूज येते आहेत. या कफ सिरपमध्ये घातक डायइथिलीन ग्लायकॉल सापडल्याचे उघड समोर आलं आहे. या चिमुकल्यांपैकी बहुतेक मृत्यू मध्यप्रदेशातील छिंदवाडा परिसरात झाले आहेत.