चिपळूण : मानवाच्या पाठीच्या माणक्यामधील दोन हाडांमध्ये असलेल्या चकतीची वयोपरत्वे झीज होऊन त्याच्या आतील पेशींनी बनलेला भाग बाहेर येऊन लगतच्या मज्जातंतूंना सुरळीत कार्य करण्यास अडथळा निर्माण होऊन त्याचा परिणाम असहाय्य अशा पाठ व कंबरदुखीमध्ये होतो. वाढणाऱ्या वया व्यतिरिक्त बदललेली जीवनशैली, संगणक व मोबाईल फोन्सचा अतिरिक्त वापर तसेच पेशींमध्ये होणाऱ्या जैविक बदलांमुळे चकतीची झीज होण्याचा वेग वाढतो. चकतीची झीज झालेल्या रुग्णांना अंतिम पर्याय म्हणून एंडोस्कोपिक डिस्केक्टमी (दुर्बिणीद्वारे) ही शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जातो. या शस्त्रक्रियेदरम्यान चकतीचा बाहेर आलेला भाग (हर्निएशन) काढला जातो, त्यायोगे मज्जातंतूंच्या कार्यातील अडथळा दूर होऊन रुग्णाची वेदना कमी होते.
डॉ. सुनील नाडकर्णी, अस्थिरोगतज्ञ् आणि डॉ.ऋता मुल्हेरकर,शास्त्रज्ञ यांनी एकत्रितरित्या चकतीतील पेशी प्रत्यारोपण करण्याचे अवघड तंत्र विकसित केले आहे. यामध्ये एंडोस्कोपिक डिस्केक्टमी दरम्यान चकतीच्या उतींचा भाग (टिश्यू) घेतला जातो. टिश्यू कल्चर तंत्रज्ञानाने रुग्णाच्या चकतीतील पेशी शरीराबाहेर प्रयोगशाळेत वाढवून, त्यांची गुणवत्ता पडताळून पुन्हा त्याच रुग्णाच्या चकतीमध्ये प्रतिरोपीत केल्या जातात. हे तंत्रज्ञान भारतात प्रथमच विकसित केले जात आहे. फेज एक क्लिनिकल ट्रायल अंतर्गत पहिल्या रुग्णामध्ये चकतीतील पेशींचे प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पडले आहे.
भविष्यात रुग्णांना याचा निश्चित लाभ होईल अशी अपेक्षा आहे. हे उपचार म्हणजे 'सेल रिजनरेटीव्ह थेरपी ' या विषयातील एक नाविन्यपूर्ण संशोधन असून पाठदुखीसाठी 'सेलथेरपी ' संशोधनाने ह्या विषयातील शोध आणि उपचाराचे नवीन दालनच उघडले आहे. 'समर्थकृपा लाईफ सायन्सेस' ह्या कंपनीने निर्माण केलेल्या तंत्राचा आर्थिक भार श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टने उचलला आहे.