
सावंतवाडी : श्री स्वराज्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे ‘स्वराज्याचे स्थापत्य अभियंता हिरोजी इंदुलकर’ यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या ‘किल्ले स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. लहान व मोठा अशा दोन गटांत घेण्यात आलेल्या या स्पर्धेत मुलांनी शिवकालीन किल्ल्यांची कलात्मक व ऐतिहासिक मांडणी करून उपस्थितांची मने जिंकली.
या स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्थापत्यकलेबद्दल, इतिहासाबद्दल आणि किल्ल्यांबद्दल अभिमानाची भावना निर्माण करणे हा होता. मुलांनी माती, दगड, कागद, रंग आणि नैसर्गिक साहित्यांचा वापर करून किल्ल्यांचे अत्यंत सुंदर व अचूक नमुने तयार केले होते. लहान गटात प्रथम क्रमांक ‘किल्ले जंजिरा’ या विषयावर उत्कृष्ट कलाकृती सादर करणाऱ्या सान्वी नाईक आणि ग्रुप यांनी पटकावला.
द्वितीय क्रमांक ‘विशाळगड - पन्हाळा’ या सादरीकरणासाठी हर्ष देसाई, कौस्तुभ राणे आणि दिव्या देसाई या तिघांना मिळाला. तर तृतीय क्रमांक ‘लोहगड’ या किल्ल्याचे उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या दर्पण देसाई याने मिळवला. मोठा गटात प्रथम क्रमांक ‘पन्हाळा - पावनखिंड - विशाळगड’ या प्रभावी सादरीकरणासाठी गणेश चित्र शाळा, निमजगा आणि दुर्ग मावळा प्रतिष्ठान यांना मिळाला. द्वितीय क्रमांक ‘सुवर्णदुर्ग’ या किल्ल्याच्या सुंदर प्रतिकृतीसाठी शिव मावळा ग्रुप याला प्रदान करण्यात आला. तर तृतीय क्रमांक ‘मंगळगड’ या कलात्मक सादरीकरणासाठी मानसराज गवस याला देण्यात आला.
येथील श्रीराम चौकात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्यांना प्रमाणपत्रे व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण समील नाईक यांनी केले. यावेळी स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष नीलेश मोरजकर, उपाध्यक्ष केदार कणबर्गी, सचिव समीर परब, खजिनदार संकेत वेंगुर्लेकर, भूषण सावंत, अक्षय मयेकर, अनुप बांदेकर, नारायण बांदेकर, शुभम बांदेकर, अनुज बांदेकर, सूर्यकांत चव्हाण, नैतिक मोरजकर, संदीप बांदेकर, रीना मोरजकर आदीसह पालक, शिक्षक व स्थानिक नागरिक उपस्थित होते. स्पर्धेमुळे मुलांमध्ये इतिहासाची जाण व स्वराज्य स्थापनेतील किल्ल्यांचे महत्त्व याची जाणीव निर्माण झाल्याचे समाधान आयोजकांनी यावेळी व्यक्त केले.










