
रत्नागिरी : भाजपाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा आज दिल्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. नगरपालिकेच्या निवडणुका घोषित झाल्या आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी सावंत यांच्या राजीनाम्यामुळे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी रत्नागिरीत शहराचा दौरा रद्द केला. सावंत यांची विवाहित कन्या व उबाठाचे उपनेते, माजी आमदार बाळ माने यांच्या सूनबाई सौ. शिवानी मिहिर माने या नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याने हा राजीनामा दिल्याचे सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खेड, चिपळूण दौऱ्यावर होते. तिथून ते दुपारी २ वाजता रत्नागिरी शहरात पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार होते. परंतु चिपळूण येथे श्री. सावंत यांनी राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली. निरनिराळ्या चर्चा नाक्यानाक्यावर सुरू झाल्या. दरम्यान, दुपारी या राजीनामा नाट्याने रवींद्र चव्हाण यांनी दौरा रद्द करून चिपळुणातून थेट रत्नागिरीत विमानतळ गाठले. तेथे भाजपा पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. त्यावेळी राजेश सावंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते बाळ माने यांची सून ही भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांची मुलगी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बाळ माने यांनी आपल्या सुनेला नगर परिषदेच्या निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महायुतीच्या बैठकीत यावर वारंवार चर्चा होणार, आपल्यामुळे पक्ष अडचणीत येऊ नये, यासाठी मी राजीनामा दिल्याचे राजेश सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्टपणे सांगितले.
माझी मुलगी शिवानी माने ठाकरे गटाकडून रत्नागिरी नगराध्यक्षपदासाठी उमदवार असणार आहे. अशावेळी मी भाजपच्या जिल्हाध्यक्षपदावर असे योग्य वाटत नाही. माझी ही अडचण पक्षाच्या वरिष्ठांच्या कानावर घालून मी माझ्या पदाचा राजीनामा दिला आहे. मी पक्षात नाराज नाही. यापुढे पक्षासाठी काम करत राहणार आहे.










