
दोडामार्ग : तिलारी घाटमार्गे गोव्याला गोमांस वाहतुक करणारा टेम्पो चंदगड पोलिसांनी पकडून दोन जणांना ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे. गोमांवस वाहतूक करणारा टेम्पो घाट माथ्यावर बंद पडल्याने हा प्रकार सगळा उघडकीस आला आहे.
गोवा ते दोडामार्ग बेळगाव कोल्हापूर मार्गावर असलेल्या तिलारी घाटातून मोठ्या प्रमाणात गोमांस वाहतूक ही केली जाते, भाजीपाला, इतर मालवाहतूक नावाखाली गोमांस वाहतूक केली जाते. अशा प्रकारे गोमांस वाहतूक करणारा कर्नाटक मधिल टेम्पो तिलारी नगर घाटमाथ्यावर बंद पडला आणि गोमांस वाहतूक प्रकरण उजेडात आले. काही जणांनी चंदगड पोलिसांना फोन करून माहिती दिली. या नंतर चंदगड पोलिसांनी गोमांस टेम्पो तसेच दोन जणांना ताब्यात घेतले. मांस वाहतूक करणारी कार जाळपोळ प्रकरण होऊन देखील तिलारी घाटातून विजघर पोलीस चेकपोस्ट येथून गोमांस गोवा राज्यात जाते हे पुन्हा उघड झाले आहे.
काही महिन्यांपूर्वी तिलारी घाटात जयकर पाॅईंट येथे एका टेम्पो मध्ये मोठ्या प्रमाणात गोमांस पोत्यात भरून वर भाताचा कुंडा भुसा पोथी टाकून खाली गोमांस भरलेल्या पिशव्या वाहतूक करताना चंदगड पोलिसांनी जागृत नागरीक यांच्या माध्यमातून पकडला होता.
बेळगाव येथून मोठ्या प्रमाणात गोमांस तिलारी घाटातून विजघर चेकपोस्ट येथून गोवा राज्यात नेले जात असताना विजघर चेकपोस्ट येथे वाहने तपासणी का केली जात नाही?. असा प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. नुकताच दारू भरलेला डंपर येथून निसटला होता. चंदगड पोलिसांनी गोमांस वाहतूक टेम्पो पकडला नसता तर तो देखील विजघर चेकपोस्ट येथून ठरल्या प्रमाणे सोडून दिला असता विजघर चेकपोस्ट येथील पोलीस कर्मचारी कारवाई का करत नाही. पाणी कुठे मूरतय, याची चर्चा सुरू झाली आहे.










