ब्युरो न्यूज : हल्ली तरुण आणि मुलांना पिझ्झा, बर्गरसारख्या जंक फूडने वेड लावले आहे. खानपानाची ही सवय घातक ठरू शकते. तरुण जर नेहमीच पिझ्झा खात असतील ते लठ्ठ होणे निश्चित आहे. धक्कादायक बाब अशी की, व्यायामानेही तुम्ही हा लठ्ठपणा घालवू शकणार नाही. हाच लठ्ठपणा भावी पिढ्यांसाठीही अडचणी निर्माण करू शकतो. तुमच्या जनुकांद्वारे मुलांच्या डीएनएमध्ये पोहोचून जंक फूड त्यांनाही लठ्ठपणा आणि मधुमेह देऊ शकतो. याबाबत युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या स्कूल ऑफ मेडिसिनचे प्रोफेसर डॉ. डीन शिलिंगर यांनी दैनिक भास्करचे रितेश शुक्ल यांच्याशी चर्चा केली.
दिनचर्येमुळे लोक आजारी पडत आहेत, अशी सार्वत्रिक धारणा आहे. जंक फूडमुळे आलेला लठ्ठपणा व्यायामाद्वारे घालवला जाऊ शकतो, हेही मिथक आहे. सत्य हे आहे की जंक फूडमुळे आलेला लठ्ठपणा व्यायाम करूनही जात नाही. पिझ्झा, बर्गर, कोल्ड ड्रिंकसह सर्व प्रकारचे प्रक्रिया केलेले अन्न जगात पसरत असलेल्या महामारीचे कारण बनले आहे. मी ३० वर्षांपासून रुग्णांची तपासणी करत आहे. ही तीच वेळ होती जेव्हा जंक फूड आहारात हातपाय पसरू लागले होते. त्या वेळी मुलांमध्ये मधुमेह नव्हता. ५० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींमध्येच तो आढळायचा. नवीन शतक सुरू होता होता मधुमेह आणि लठ्ठपणा ही एक सामान्य बाब झाली. युरोप आणि अमेरिकेत सरकारांनी कारवाईचा फास आवळल्यानंतर या कंपन्यांनी आशिया, दक्षिण अमेरिका, अाफ्रिकेत पाय पसरले. आज भारतात मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत हे आजार फैलावल्याचे तुम्ही पाहत आहात.’
इंटरनॅशनल जर्नल ऑफ ओबेसिटीने अलीकडेच अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅलर्जी अँड इन्फेक्शियस डिसीजच्या २०१४ च्या अहवालाला अंतिम रूप दिले. अहवालात म्हटले आहे, की जन्मापासून वयात यायच्या आधीपर्यंत मुलांच्या डीएनएत लठ्ठपणा वाढवणारी जनुके असतात. हे संशोधन ६३ वर्षांच्या अभ्यासानंतर प्रकाशित करण्यात आले आहे. यात ३८,५३० जुळ्या मुलांचे (एकूण ७७,०६०) डीएनए, लठ्ठपणा, उंचीवर ते १९ वर्षांचे होईपर्यंत संशोधन झाले. जंक फूड शरीरात वाईट जिवाणू पोहोचवतो. ते चांगल्या जिवाणूंची जागा घेतात. येथूनच लठ्ठपणा आणि मधुमेहाची सुरुवात होते. हे वाईट जिवाणू नैसर्गिक इन्सुलिनला निष्क्रिय करून टाकतात. समस्या अधिकच अक्राळविक्राळ झाली आहे, कारण मुलांना हे आई-वडिलांकडून वारसा म्हणून मिळत आहे.
लठ्ठपणा रोखण्यासाठी रिफाइंड तेल नव्हे, गावरान तूप उपयुक्त
रिफाइंड तेलाऐवजी देशी तुपातील घरच्या ताज्या जेवणात दही, अॅपल व्हिनेगरचा वापर चांगल्या आरोग्यासाठी रामबाण आहे. प्रत्येक पाकिटावर सोप्या भाषेत खरे लेबलिंग सरकारने करायला हवे. खाद्यपदार्थ आरोग्यदायी नसतील तर तंबाखूच्या पुडीवर असतात तशी छायाचित्रे त्यावरही छापली पाहिजेत. दक्षिण अमेरिकेत अशा पदार्थांवर कर लावण्याचा प्रयोग यशस्वी ठरत आहे.