
कणकवली : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, छत्रपती संभाजीनगर द्वारा आयोजित राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो क्रीडा स्पर्धा सन २०२५-२६ संपन्न झाली. माध्यमिक विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेज कनेडी प्रशालेने सालाबादप्रमाणे यावर्षी राज्यस्तरीय वैयक्तिक क्रीडा प्रकारात राज्यात आपला दबदबा कायम ठेवत नावलौकिक मिळवला आहे.
इयत्ता १२ वी विज्ञान मधील प्रज्योती जाधव हिने सुवर्णपदक मिळविले असून तिची निवड जम्मू काश्मीर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे. प्रज्योतीला क्रीडा स्पर्धेची आवड असून जिल्हास्तरावरील विविध क्रीडा प्रकारात तीने यश संपादन केले आहे. प्रशालेतील अष्टपैलू खेळाडू म्हणून तीची ओळख निर्माण झाली आहे. सध्या ती तायक्वांदो स्पर्धेचा सराव नियमित करत आहे. या यशस्वीतेसाठी कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश सावंत, संस्था पदाधिकारी, शालेय समिती चेअरमन श्री.आर.एच. सावंत, शालेय समिती पदाधिकारी तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुमंत दळवी, मार्गदर्शक शिक्षक बयाजी बुराण, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी, क्रीडा प्रेमी यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले.