
सावंतवाडी : दिवाळीच्या मंगलमय पर्वावर सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवत 'दयासागर फाऊंडेशन'ने मयेकरवाडी, शेरवड, डोबाचीशेळ, इन्सुली येथील असिसी मतिमंद मुलींच्या निवासस्थानास सदिच्छा भेट दिली. यावेळी आश्रमातील मुलींना दिवाळीचा फराळ तसेच त्यांच्या गरजेनुसार जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
फाऊंडेशनचे अध्यक्ष अॅड. अक्षय साळगांवकर आणि सदस्य मायकल फर्नांडिस यांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडला. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आश्रमातील मुलींशी संवाद साधून त्यांच्याप्रती आपुलकी व्यक्त केली. या भेटीमुळे आश्रमातील मुलींच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आणि त्यांचे मनोधैर्य वाढण्यास मदत झाली. 'दयासागर फाऊंडेशन'ने दिवाळीच्या निमित्ताने केलेल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल आणि सामाजिक योगदानाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.