LIVE UPDATES

सावंतवाडीचा सुपुत्र अनिकेत वाडकर भारतीय लष्करात लेफ्टनंट

१३ अपयशांनी खचला नाही , १४ व्या प्रयत्नात गाठले ‘लेफ्टनंट’चे शिखर
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 11, 2026 15:48 PM
views 68  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

रत्नागिरी : जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर रत्नागिरीतील अनिकेत निलेश वाडकर यांनी भारतीय लष्करात अधिकारी होण्याचे बालपणीचे स्वप्न साकार केले आहे. मूळचे सावंतवाडी येथील आणि कोकण रेल्वेत कार्यरत असलेले निलेश वाडकर व स्नेहा वाडकर यांचे सुपुत्र अनिकेत यांची भारतीय लष्कराच्या Corps of Engineers मध्ये लेफ्टनंटपदी नियुक्ती झाली आहे. ५ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या पासिंग आऊट परेडमध्ये त्यांनी लष्करी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले.

लहानपणापासूनच अनिकेतला भारतीय लष्कराचे विशेष आकर्षण होते. सैनिकी गणवेश, शिस्त आणि देशसेवेची भावना यामुळे त्याने लष्करात अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले. शालेय जीवनात एनसीसी मध्ये सहभागी झाल्यानंतर हे स्वप्न अधिक दृढ झाले.

पदवीचे शिक्षण घेत असतानाच त्याने लष्करी अधिकारी होण्यासाठी आवश्यक परीक्षांची तयारी सुरू केली. मात्र यशाचा मार्ग त्याच्यासाठी सहज नव्हता. जवळपास पाच वर्षांच्या कालावधीत त्याला अनेक अपयशांचा सामना करावा लागला. लेखी परीक्षांमध्ये अपयश आले, SSB मध्येही अपयश आले. दोन वेळा SSB यशस्वीरीत्या पार करूनही अंतिम मेरिटमध्ये स्थान मिळाले नाही.

तब्बल तेरा प्रयत्नांमध्ये अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र प्रत्येक अपयशानंतर खचून न जाता त्याने पुन्हा नव्याने तयारी सुरू केली. अपयशाला अडथळा न मानता त्यातून शिकत त्याने आपले ध्येय कायम डोळ्यांसमोर ठेवले.अखेर चौदाव्या प्रयत्नात अनिकेतने मुलाखत, वैद्यकीय चाचणी आणि अंतिम मेरिटचे सर्व टप्पे यशस्वीरीत्या पार केले. अंतिम यादीत आपले नाव असल्याची बातमी मिळाल्यानंतर त्याच्या पाच वर्षांच्या संघर्षाला यशाची किनार मिळाली. या यशामागे तेरा अपयशी प्रयत्न, सातत्यपूर्ण मेहनत, कठोर आत्मपरीक्षण आणि ध्येयाप्रती असलेली अढळ निष्ठा आहे.

सप्टेंबर २०२५ मध्ये Officers Training Academy, Gaya येथे त्याच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली. खडतर शारीरिक प्रशिक्षण, कठोर शिस्त आणि मानसिक कसोटीचे विविध टप्पे पार करत त्याने लष्करी प्रशिक्षण पूर्ण केले.

५ सप्टेंबर २०२६ रोजी पासिंग आउट परेडमध्ये लष्करी गणवेश परिधान करताना त्याचे भारतीय लष्करात अधिकारी होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले. भारतीय लष्कराच्या Corps of Engineers मध्ये लेफ्टनंट म्हणून त्याची नियुक्ती झाली.

आपल्या या प्रवासाविषयी बोलताना अनिकेतने जिद्द, सातत्य आणि अपयशातून शिकण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्याच्या मते, “स्वप्न पाहणे सोपे असते; मात्र ते पूर्ण करण्यासाठी अपयशानंतरही पुन्हा उभे राहण्याची तयारी असावी लागते.”

अनिकेतच्या या उल्लेखनीय यशामुळे वाडकर कुटुंबीयांचा आनंद द्विगुणित झाला आहे. त्याचे शिक्षक, मित्रपरिवार, नातेवाईक तसेच रत्नागिरी आणि सावंतवाडी परिसरातील नागरिकांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.तेरा अपयशांनंतर चौदाव्या प्रयत्नात मिळवलेले अनिकेतचे हे यश अनेक तरुणांसाठी जिद्द, चिकाटी आणि सातत्याचा प्रेरणादायी आदर्श ठरले आहे.