लिहिणं आणि जगणं यात दांभिकपणा असू नये : सरिता पवार

Edited by:
Published on: April 28, 2024 05:58 AM
views 75  views

'जागर' कोकणच्या साहित्य रत्नांचा..!

कवयित्री सरिता पवार, मुलाखत

पुष्प : २७ वं.

▪️साहित्यातून माणूसपणाला न्याय मिळवून देणं गरजेचं : सरिता पवार 

कोकणचं पहिलं दैनिक कोकणसाद व कोकणचं नं. 1 महाचॅनलं कोकणसाद LIVE च्या माध्यमातून 'जागर' कोकणच्या साहित्य रत्नांचा', हे विशेष सदर सुरु आहे. या सदराच्या च्या २७ साव्या पुष्पात साहित्यिक सरिता पवार-चव्हाण यांची दैनिक कोकणसादचे संपादक संदीप देसाई यांनी घेतलेली ही खास मुलाखत.

प्रश्न १ :तुमच्या लेखनाची सुरुवात कशी झाली ?

लोकांच्या घरात कपड्यांचा इतर गोष्टींचा पसारा असतो तसं माझ्या घरी पुस्तकांचा पसारा असायचा. माझे वडील शिक्षक होते. आई-वडील, मोठ्या भावंडांना वाचनाची आवड होती. वाचनसंस्कृती घरात रूजलेली होती. घरात टीव्ही नव्हता, आम्ही सर्वजण पुस्तक वाचायचो. नरडवे गावात आम्ही राहायचो. वडील दर शनिवार- रविवारी कणकवलीत बाजारासाठी यायचे. ते घरी आल्यानंतर त्यांनी खाऊ कोणता आणला यापेक्षा वाचण्यासाठी कोणती पुस्तकं आणली याची फार उत्सुकता असायची. वडील आमच्या लहानपणी चांदोबा, ठकठक सारखी पुस्तक आणायचे. लोकप्रभा, साप्ताहिक सकाळ, चित्रलेखा यासारखी साप्ताहिक, दिवाळी अंक आमच्या घरी असायची. कणकवलीपासून २६ किमी दूर आमचा गाव होता. गावात चार ते पाच जणांकडे वर्तमानपत्र यायच. त्यातील एक कुटुंब आमचं होत. वाचनाचं महत्व घरात एवढं होत की गावातील ग्रंथालयात असणारी सगळी पुस्तकं आम्ही भावंडांनी वाचून काढलेली होती. वाचनाचा संस्कार त्यातून आमच्यात रूजत गेला. यातूनच पुढे लिखाण होत गेलं. कवितेतला प्रवेश हा अपघाती होता‌. दहावीच्या परीक्षेला जाण्याआधी आईनं गावातील थोरामोठ्यांचे आशीर्वाद घ्यायला सांगितले. तेव्हा माझे काका चप्पल शिवत बसले होते. त्यांच्या पाया पडल्यानंतर आशीर्वाद देताना ते म्हणाले, ''माझा पोरग्या खूप गुणाचा आसा, तेका रामासारखो घोव मिळांदेत'' हे ऐकून माझ्या डोक्यात चक्र सुरू झाल, काकांना माझ्या परिक्षेची काही पडलेली नाही. त्यांच्यासाठी महत्वाच हे आहे की, आपल्या गुणी मुलीला रामासारखा नवरा मिळावा. नंतर रामासारखा नवरा मिळाला तर आपण सुखी होऊ का ? हा विद्रोही विचार होता. प्रश्न विचारण्याच धाडस जे वाचनाने दिलं होत त्यानुसार हा प्रश्न डोक्यात पिंगा घालत राहिला. नुकतच रामायण पाहिलं होतं, जेवढं रामायण पाहिलं तेवढाच राम ठावूक होता. माझ्या त्या वयात नवरा या व्याख्येत राम बसत नव्हता. त्यावेळी एक स्फुट लिहून काढलं. त्यावेळेला कळलं नाही की ती कवीता आहे. पण, माझी मोठी बहीण जी लिहीत होती तीन ते वाचलं अन् ही कवीता असल्याचं सांगितलं. तेव्हा माझं वय पंधरा-सोळा वर्षांच असेल. त्यानंतर ही कविता  अनेक काव्य संमेलनात सादर केली. अनेक पुरस्कार त्याला मिळाले. या स्वयंसिद्ध कवीतेपासून माझा प्रवास सुरु झाला. 

'राखायला हवी निजगून' तुमचा पहिला कविता संग्रह. या कविता लेखन व संवादासाठी कुणाच मार्गदर्शन मिळालं.

कवितेच्या निमित्ताने जिल्ह्यात फिरत असताना जिल्ह्यातील प्रा. प्रवीण बांदेकर, अजय कांडर, वीरधवल परब, मनीषा पाटील अशा अनेक साहित्यिकांचा सहवास लाभला.‌ उषा परब यांच्या कवयित्री संमेलनात महाराष्ट्रभरतील दिग्गज कवयित्री यायच्या, मी लहान असून देखील मला त्यांनी व्यासपीठ दिलं होत. पद्मश्री मधू मंगेश कर्णिक, वैशाली पंडीत, वृंदा कांबळी अशी दिग्गज माणसं भेटत गेली. सत्यशोधक चळवळ, कोकण मराठी साहित्य परिषद, राष्ट्रसेवा दल अशा चळवळ आणि साहित्य या दोन्ही गोष्टी एकाचवेळी माझ्या आयुष्यात सुरू झाल्या होत्या. चळवळीशी जोडून घेतल्यानं वास्तववादी लेखनाकडे माझा भर होता. कविता लेखनाला २० वर्ष झाल्यानंतर कुटुंबीय व मार्गदर्शकांच्या सल्ल्यानं कवितासंग्रह प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. वाचकांचां प्रतिसाद मिळाला. पुरस्कार देखील त्याला प्राप्त झाले. 

तुम्ही कवितेबरोबर कथा लेखनही करता या विषयी काय सांगाल?

कथालेखन कवीता लिहीत असतानाच लिहिण्यास सुरु केली.  घे भारारी, आकाश पेलताना या दोन्ही कथांना कॉलेज जीवनात स्पर्धांत नंबर प्राप्त झाला होता. मध्यंतरीच्या काळात थोडा कथा लेखनात खंड पडला. चार वर्षांपूर्वी मालवणी कथा स्पर्धेत एक मालवणी कथा हायवेच्या कामामुळे ओरबाडल्या गेलेल्या निसर्गावर लिहीली. त्यानंतर अंधश्रद्धेवर एक कथा लिहीली. ज्यामुळे एका विद्यार्थ्यांचा जीव गेला होता. तो प्रसंग हेलावून सोडणारा होता. त्यावर फेरो ही कथा लिहीली. कोरोना काळात माणसामाणसातील निर्माण झालेल्या अंतरावर कथा लिहीली‌ गेली. सगळ्याच कथांना राज्यस्तरीय पारितोषिक मिळाली. वास्तवदर्शी अनुभव कथांतून मांडले आहेत. कथा आणि कविता लिहीताना समाधान मिळालं आहे. कविता परिपूर्ण होते तेव्हाच समाधान वेगळं असत. 


*तुम्ही राष्ट्र सेवा दलाचे शिबिरही आयोजित करता, या माध्यमातून सुरु आसलेल्या चळवळीबद्दल काय सांगाल ?*

वडील समाजवादी विचारांचे होते. समाजभान जपणं, सामाजिक बांधिलकी ही संस्कारातच होती. साहित्य आणि चळवळ एकाचवेळी माझ्या आयुष्यात सुरू झाली. कै. प्रा.पांडुरंग येजरे यांनी सावंतवाडीत राष्ट्र सेवा दलाच शिबीर आयोजित केलं होत. त्यानंतर अनेक ठिकाणी शिबिरात सहभाग घेतला. त्यातून माझ्यापलीकडे एक जग आहे हे लक्षात आलं. त्या जगात अनेक गोष्टी माणूसपणाल आव्हान देत असतात. ते माणूसपण जागत ठेवण्यासाठी चळवळीत कार्यरत होते. अनेक माणसं यातून जोडली गेली. त्यातून राष्ट्र सेवा दलाची शिबीर आपल्या मुलांसाठी मी व पती राजन चव्हाण यांनी मिळून सिंधुदुर्गत आयोजित केल. राज्यभरातील मुलं निवासी शिबीरासाठी येतात. यातून संविधानिक विचार आम्ही यातून मुलांना दिला. रूजवलेल्या विचाराची फळं आम्हाला दिसत आहेत. मानवतावादी विचारांची सुंदर साखळी या शिबीरातून तयार झाली आहे.‌


*आगामी काळात लेखनाचा काय संकल्प आहे?*

कविता संग्रह यायला २० वर्ष लागली. आता कथासंग्रह प्रकाशित करायचा आहे. दहा कथा पारितोषिक प्राप्त आहेत. या एक-दोन वर्षात तो येईल. 'अद्वैत' या दिवाळी अंकाच संपादन मी करते. सहसा न बोलले जाणारे विषय घेऊन आम्ही काम करत आहोत. 


*जातीनुसार माणसांची विभागणी केली जातेय. अशावेळी साहित्यिक व लेखक, कवी अगदी तुमची भूमिका कशी राहिली आहे ?*

साहित्यिक नाही तर प्रत्येक माणसाने आपली माणूस म्हणून ओळख निर्माण करायला हवी. जात, धर्म, पंत, भाषा या पलिकडे नुसतं लिखाण नाही तर जगणही तसंच आहे. या सर्वांच्या पलीकडे जगल पाहिजे. मानवनिर्मित कृत्रिम भेदभाव आहेत ते या काळात तीव्र होताना दिसत आहे. त्या भिंती आपण ओलांडताना कोणतातरी वादी असण्यापेक्षा मानवतावादी असणं  व साहित्यातून माणूसपणाला न्याय मिळवून देणं गरजेचं आहे. लिहिणं आणि जगणं यात अंतर, दांभिकपणा असता नये. लिहिणं जगण्याच प्रतिबिंब झालं तर माणूसपणाशी आपण प्रामाणिक राहतो. विद्रोह केल्याशिवाय समानता येत नाही. पण, विद्रोह हे नेहमी आक्रस्ताळा असावा असं नाही. संयमीपणे सुद्धा विद्रोह समोरच्याला पटवून देऊ शकतो. जात, धर्म यापलीकडे आमचं जगणं गेलेलं आहे.


*नव्या पिढीला काय संदेश द्याल ?*

वाचन संस्कृती लोप पावत चालली यावर माझा विश्वास नाही. तरूण पिढी सजगपणे वाचत आहे. वस्तूनिष्ठ, वास्तवाला थेट भिडणारी ही पिढी आहे. वेगळ्या पद्धतीनं त्यांचं लिखाण पुढे येत आहे. अनेक नवसाहित्यिक व्यक्त होत आहे. आताचा काळात निर्भयपणे व्यक्त होण हे खरं साहित्यिकांसमोरच आव्हान आहे. अभिव्यक्तीवर गदा येताना आपण पाहात आहोत. अशावेळी निर्भयपणे मत मांडण खूप आवश्यक आहे. आपल्यातील माणूसपण हरवणार नाही याची काळजी नव्या पिढीने घ्यावी.