
सावंतवाडी : मळेवाड - कोंडुरे देऊळवाडी येथे रविवारी चौघा ग्रामस्थांवर हल्ला करून गंभीर जखमी केलेल्या त्या बिबट्याला काल सायंकाळी वनविभागाने जेरबंद केले होते. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्याला नेण्यात आले होते. यानंतर अधिक उपचारासाठी त्याला कराड येथे हलविण्यात आले आहे.
मळेवाड नजीकच्या कोंडूरे देऊळवाडी येथे वस्तीत शिरून चौघांवर हल्ला केलेल्या बिबट्याला उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल सुहास पाटील, आजगाव वनपाल पृथ्वीराज प्रताप, मळगाव वनपाल प्रमोद राणे, आजगाव, बांदा, मळगाव, माजगाव वन परिमंडळातील वन कर्मचारी तसेच कुडाळ आणि सावंतवाडी येथील जलद कृती दलाचे कर्मचाऱ्यांनी पिंजऱ्यात कैद केले. या बिबट्याला ताब्यात घेत वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यामध्ये तो उपाशी असल्याने अस्वस्थ असल्याचे तसेच अंगावर काही जखमा असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार या बिबट्याला कराड येथील वन्य प्राणी उपचार केंद्रात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्याच्यावर उपचार करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहीती वनविभागाने दिली आहे.