
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणींमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. 200 कोटी रुपयांच्या कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने तिची याचिका फेटाळली आहे, ज्यामुळे तिच्यावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता अधिक बळावली आहे.
हा संपूर्ण वाद सुकेश चंद्रशेखर या आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपीशी संबंधित आहे. 2021 मध्ये उघडकीस आलेल्या या प्रकरणात, सुकेशने तिहार जेलमधून राहत असतानाच मोठ्या रकमेचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. त्याने काही बड्या व्यक्तींची फसवणूक करून तब्बल 200 कोटी रुपये उकळले, असा दावा अंमलबजावणी संचालनालयाने (ED) केला आहे. ED च्या चौकशीनंतर समोर आलेल्या माहितीनुसार, सुकेशने या पैशांचा वापर करून जॅकलिन फर्नांडिसला महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. या गोष्टींच्या आधारावर तपास यंत्रणांनी तिलाही सह-आरोपी ठरवले आहे.
या प्रकरणात जॅकलिनने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करत, तिच्यावरचे सर्व आरोप खोटे व निराधार असल्याचा दावा केला होता. तिने सांगितले की, सुकेशने तिला जाणीवपूर्वक फसवलं असून ती या आर्थिक घोटाळ्याची शिकार झाली आहे. तसंच यामध्ये तिला अडकवण्यात आलं असून तिची कोणतीही भूमिका नाही, असे स्पष्ट करत तिने दाखल एफआयआर रद्द करण्याची विनंती केली होती.
मात्र, न्यायालयाने तिची याचिका फेटाळत, ईडीचे आरोपपत्र आणि या प्रकरणात न्यायालयीन प्रक्रियेची वैधता कायम ठेवली आहे. त्यामुळे जॅकलिनविरुद्ध सुरू असलेली खटल्याची कार्यवाही पुढे सुरूच राहणार असून, तिला न्यायालयासमोर उत्तर देणे बंधनकारक ठरणार आहे.
काय आहे सुकेश चंद्रशेखरचा घोटाळा?- सुकेश चंद्रशेखर हा अनेक मोठ्या आर्थिक फसवणुकीचा आरोपी असून त्याने तुरुंगात असतानाही विविध व्यक्ती व संस्थांची फसवणूक केली आहे. 200 कोटी रुपयांच्या या प्रकरणात, त्याने आपली ओळख लपवून अनेकांना गंडा घातल्याचा आरोप आहे. या तपासादरम्यान त्याच्याशी संबंधित असलेल्या महागड्या भेटवस्तू, लक्झरी आयटेम्स यांचा संबंध जॅकलिन फर्नांडिसशी जोडला गेला.
तथापि, जॅकलिनने या सर्व आरोपांना स्पष्टपणे नकार दिला असून, तिच्यावरचा खटला मागे घ्यावा अशी मागणी केली होती. मात्र आता न्यायालयाने ती विनंती नाकारल्यामुळे तिच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत.