मालमत्ता वादातून दोन भावांमध्ये हाणामारी

परस्परविरोधी तक्रारी दाखल
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: January 31, 2026 21:01 PM
views 27  views

वैभववाडी : मालमत्तेच्या वादावरून दोन सख्ख्या भावांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना आज (ता. ३१) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास नाधवडे गावठणवाडी येथे घडली. या हाणामारीत दोघांनाही दुखापत झाली असून, दोघांनी एकमेकांविरोधात वैभववाडी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. नाधवडे गावठणवाडी येथे रमेश श्रीपत चव्हाण यांचे घर व शेती असून ते पत्नी रश्मी चव्हाण यांच्यासह तेथे राहतात. त्यांना पराग चव्हाण व प्रतीक चव्हाण अशी दोन मुले आहेत. पराग हा तळेरे येथे, तर प्रतीक कुंभवडे येथे वास्तव्यास आहे. नाधवडे येथील मालमत्तेवरून गेल्या दोन वर्षांपासून भावांमध्ये वाद सुरू असल्याचे समजते.

आज सकाळी दोघेही आई-वडील राहत असलेल्या नाधवडे येथे आले असता, मालमत्तेच्या मुद्द्यावरून त्यांच्यात प्रथम शाब्दिक बाचाबाची झाली. वाद वाढल्यानंतर दोघांनीही एकमेकांना लाकडी दांड्याने मारहाण केली. या घटनेत दोघांच्याही डोके व हाताला दुखापत झाली आहे. या प्रकरणी पराग चव्हाण याने प्रतीक याने कोणतेही कारण नसताना लाकडी दांड्याने मारहाण करून डोक्याला दुखापत केल्याची तक्रार दिली आहे. तर प्रतीक चव्हाण याने वडिलांशी मालमत्तेसंदर्भात चर्चा सुरू असताना पराग तेथे येऊन शिवीगाळ करत हाताने व दांड्याने मारहाण केल्याची तक्रार दिली आहे. या घटनेप्रकरणी वैभववाडी पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारी नोंदवून दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.