घावनळे खुन प्रकरणातील आरोपीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: January 22, 2026 22:40 PM
views 67  views

 कुडाळ : घावनळे येथील अल्पवयीन मुलगी हिचे खुन प्रकरणातील आरोपी कुणाल कृष्णा कुंभार याचा नियमीत जामीन अर्ज मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय, सिंधुदुर्ग यांनी फेटाळला अशी माहीती प्रसिद्धी पत्रकाद्वारे कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली. 

      या बाबत सविस्तर वृत्त असे की,  कुडाळ घावनळे येथील अल्पवयीन मुलगी वय १७ वर्षे ०२ महीने ही दुसऱ्या मुलासोबत बोलते या कारणावरुन तिचे परीचयाचा कुणाल कुंभार रा. गाठोस ता. कुडाळ याने वाडोस येथे नेवून नायलॉन दोरीने गळा आवळून तिचा खून केला.  नमुद गुन्हयातील आरोपी विरुद्ध पोलीसांनी सबळ पुरावा गोळा करुन दोषारोप पत्र मुदतीत  न्यायालयात सादर केलेले आहे. नमुद गुन्हयातील आरोपी कुणाल कुंभार हा दि. ३०.०९.२०२५ रोजी पासून प्रथम पोलीस कोठडी रिमांड व त्यानंतर न्यायालयीन कोठडी रिमांडमध्ये जिल्हा कारागृहामध्ये बंदीस्त आहे.

     आरोपी कुणाल कुंभार याने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय, सिंधुदुर्ग यांचे न्यायालयात नियमित जामीन मिळणेकरीता अर्ज सादर केलेला होता. नमुद अर्जाची सुनावणी न्यायालयात झाली, न्यायालयात आरोपीत याचे विरुद्ध प्राप्त पुरावे व अन्य केसचे दाखले अभियोग पक्षातर्फे सविस्तर मांडण्यात येवुन आरोपीचे जामीन अर्जास कडाडून विरोध करण्यात आला. न्यायालयाने आरोपीचे वकील व अभियोग पक्षाचे म्हणणे ऐकून घेवुन नमुद आरोपीत याने स्वतःहून दाखविलेला मृतकाचा मृतदेह, तसेच नमुद गुन्हा हा जलद गती न्यायालयात सुनावणी करीता घेणार असल्याचे अभियोग पक्षातर्फे मांडण्यात आलेले मुद्दे विचारात घेवुन तसेच आरोपीत विरुद्ध गुन्हा केल्याचा सबळ पुरावा असल्याची नोंद घेवून नमुद आरोपीत याचा नियमित जामीन अर्ज फेटाळला. सदर प्रकरणात सरकारी पक्षातर्फे वकील  रुपेश देसाई यांनी काम पाहीले.

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग डॉ  मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक  नयोमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी, सावंतवाडी विनोद काबळे, कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम, पोलीस अंमलदार कृष्णा केसरकर यांनी केलेली आहे.