
वैभववाडी : आरामबसमधून प्रवास करणाऱ्या एका तरुण फोटोग्राफरच्या बॅगेतून कॅमेरा, बॅटरी व मेमरी कार्ड असा सुमारे अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल अज्ञाताने चोरल्याची घटना घडली आहे. या चोरीतील संशयित बसमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून हा प्रकार करूळ येथील एका हॉटेलनजीक घडला.
कर्नाटक राज्यातील बसवणवाडी तांडी येथील किरण मारूती राठोड (वय १९) हे व्यवसायाने फोटोग्राफर आहेत. ते २५ जानेवारी रोजी शूटिंगसाठी गोवा येथे गेले होते. शूटिंग आटोपल्यानंतर २८ जानेवारी रोजी ते आरामबस (क्रमांक एम.एच. ०९ एव्ही-९१३०)ने गोवा ते नांदेड असा प्रवास करीत होते.
दरम्यान, सदर आरामबस रात्री साडेआठच्या सुमारास करूळ येथील एका हॉटेलनजीक विश्रांतीसाठी थांबविण्यात आली. यावेळी श्री. राठोड हे हॉटेलमध्ये फ्रेश होण्यासाठी गेले. दहा ते पंधरा मिनिटांनंतर बस पुन्हा कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाली. काही अंतरावर करूळ तपासणी नाक्यावर बस थांबविण्यात आली. तेथे पोलिसांकडून प्रवाशांच्या बॅगची तपासणी सुरू होती.
तपासणीदरम्यान श्री. राठोड यांच्या बॅगेतून कॅमेरा, बॅटरी व मेमरी कार्ड गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर बसमधील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली असता, एक संशयित श्री. राठोड यांच्या बॅगेतून कॅमेरा काढताना स्पष्टपणे दिसून आला. या प्रकरणी श्री. राठोड यांनी काल रात्री उशिरा वैभववाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात संशयिताविरोधात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.











