
सावंतवाडी : महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात नालासोपारा येथून फरार झालेल्या एका ५१ वर्षीय आरोपीला सावंतवाडी पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले आहे. ध्रुवकुमार शिवसहाय शर्मा (रा. नालासोपारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याला पुढील कारवाईसाठी नालासोपारा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वसई-विरार महानगरपालिका हद्दीतील नालासोपारा (तुळींज) पोलीस ठाण्यात आरोपी ध्रुवकुमार शर्मा याच्यावर एका महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला होता. तो कोकणात लपून बसल्याची माहिती नालासोपारा पोलिसांनी सावंतवाडी पोलिसांना दिली होती. नालासोपारा पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे, सावंतवाडी पोलीस ठाण्याचे ASI निलेश परब आणि हवालदार मनोज राऊत यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक विश्लेषण आणि स्थानिक बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सावंतवाडी परिसरात असल्याची खात्री पटली. पोलिसांनी सापळा रचून ध्रुवकुमार शर्मा याला शोधून काढले आणि त्याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी ही कारवाई केल्यानंतर नालासोपारा पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरोपीला नालासोपारा पोलिसांच्या पथकाच्या ताब्यात देण्यात आले आहे.













