
कणकवली : केरळ ते मुंबई प्रवास करत असताना थ्रिजा पॉल या महिला प्रवाशाची बॅग चोरीला गेली. त्यामध्ये रोख रक्कमेस आयफोन आणि सोन्याचे दागिने मिळून १ लाख ३१ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. या प्रकरणी पॉल यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
थ्रिजा पॉल (वय ७३, रा. त्रिशूर - केरळ) ह्या केरळ ते मुंबई असा गरीबरथमधून प्रवास करत होत्या. १६ जानेवारीला पहाटे ३.१० च्या सुमारास या एक्सप्रेसने कणकवली स्थानक सोडल्यानंतर पॉल यांना त्यांच्याकडील एक हॅण्डबॅग नसल्याचे दिसून आले. लगतच्या प्रवाशांकडे विचारणा केली असता, ही गाडी कणकवलीत थांबली होती, त्यावेळी अज्ञाताने ती बॅग लांबविल्याची शक्यता वर्तविण्यात आली. त्यानंतर पॉल यांनी याबाबतची तक्रार रेल्वेतील तिकिट तपासणीसांकडे केली. त्यानंतर ठाणे रेल्वे स्थानकातही याबाबतची तक्रार दिली. मात्र, ही घटना कणकवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असल्याने रेल्वेतील बॅग चाेरीची तक्रार कणकवली पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे.
प्रवासादरम्यान पॉल यांच्या बॅगेतून एक सोन्याची चेन, एक आयफोन आणि ३ हजार ५०० रूपये रक्कम असा १ लाख ३१ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. या चोरी प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार अवधूत गुणीजन करत आहेत.













