
सावंतवाडी : तळवडे-निरुस्तेवाडी येथील गॅरेजच्या मागे सुरू असलेल्या 'अंदर-बाहर' जुगार अड्ड्यावर सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बुधवारी रात्री धाड टाकली. या कारवाईत रोख रक्कम आणि ७ मोटारसायकलींसह एकूण ४ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संशयित आरोपींविरुद्ध सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २१ जानेवारी २०२६ रोजी रात्री ९ ते ११ च्या सुमारास तळवडे निरुस्तेवाडी येथील गॅरेजपासून सुमारे २०० मीटर अंतरावर उघड्या जागेत जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मुख्य संशयित आरोपी रविंद्र विनायक लोके हा चार्जिंग बल्बच्या उजेडात 'अंदर-बाहर' नावाचा जुगार खेळवत होता. यावेळी परिसरातील अन्य १० जण तिथे पैसे लावून जुगार खेळत असताना रंगेहात पकडले गेले. यात रोख रक्कम २१,००० रुपये. व आरोपींनी वापरलेल्या ७ मोटारसायकली असा एकूण ४, लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही धडक कारवाई सिंधुदुर्गचे जिल्हा पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. कोल्हे यांच्या पथकाने केली. या टीममध्ये पीएसाय सुधीर सावंत, जमादार सुरेश राठोड,
हवालदार प्रकाश कदम, गोसावी, डिसोजा, गंगावणे, तवटे आणि समजिस्कर आदी उपस्थित होते. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.












