
सावंतवाडी : सावंतवाडी येथील रहिवासी व सध्या डोंबिवली येथे वास्तव्यास असलेले प्रसिद्ध हार्मोनियमवादक सुरेश मेस्त्री ( वय ८२) यांचे १६ जानेवारी रोजी निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे. त्यांनी सावंतवाडी व ओरोस येथे मलेरिया (आरोग्य) खात्यात टेक्निशियन म्हणून नोकरी केली. त्यांचे काका कै रघुनाथ उर्फ बाबी मेस्त्री यांच्याकडे त्यांनी हार्मोनियम वादनाचे धडे गिरविले व व्यावसायिक कलाकार नसूनही सावंतवाडीजवळच्या परिसरात हार्मोनियम वादक म्हणून सुमारे ४० वर्षे संगीत सेवा केली. यात शास्त्रीय, नाट्यसंगीत, सुगम संगीत, भजन व कीर्तन यांचा समावेश आहे. सावंतवाडी संगीत मित्रमंडळासाठी १९९५ ते २०१५ पर्यंत हार्मोनियम साथ केली. १९९० ते २०१५ पर्यंत कै. उदय सिद्धये संचलित स्वराभिषेक संस्थेच्या कार्यक्रमांना संगीतसाथ दिली. कै. दिनकर धारणकर यांच्या नाट्यदर्शन संस्थेची संगीत नाटके व संगीत कार्यक्रमाला साथ केली. नाट्यदर्शन संस्थेचे विजय फातर्पेकर दिग्दर्शित 'लीला गौरीहरा'च्या या नृत्यनाट्याच्या अनेक प्रयोगांना साथ केली. २००३ साली किरण सिद्धये यांच्याबरोबर अभिनव संगीत विद्यालयाची स्थापना केली व २०१५ पर्यंत संगीत गुरु म्हणून कामगिरी केली. १९७५ ते २०१५ पर्यंत रमेश उर्फ बाबा खोत (तबला), सुरेश मेस्त्री (हार्मोनियम) यांनी ४० वर्षे संगीत क्षेत्राला योगदान दिले. संगीत गुरु रघुनाथ मेस्त्री, लहान भाऊ कै. उमेश मेस्त्री, कै. उदय सिद्धये, कै. मधु पास्ते तसेच श्रीपाद चोडणकर, सुनील पाडगावकर, किरण सिद्धये आदी अनेक कलाकरांना हार्मोनियम साथ दिली होती. सद्गुरू संगीत विद्यालयाचे संचालक निलेश मेस्त्री यांचे ते चुलत बंधू होत.











