
सावंतवाडी : महायुतीतील घटक पक्ष भाजप आणि शिवसेनेत आंबोली, मळेवाड मतदारसंघात एबी फॉर्म युद्ध पहायला मिळालेल असताना आता कोलगाव पंचायत समितीतही भाजप आणि शिवसेनेन आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म जोडले आहेत. त्यामुळे भाजप आणि शिवसेना समोरासमोर येण्याची शक्यता आहे.
आंबोली, मळेवाड जिल्हा परिषद व पंचायत समितीत भाजप आणि शिवसेनेकडून एकमेकांसमोर उमेदवार उभे केले आहेत. महायुतीत फुट पडल्याच समोर असताना आता कोलगाव पंचायत समिती मतदारसंघात दोन्हीकडून एबी फॉर्म जोडले आहेत. कालपर्यंत ही जागा शिवसेनेला सोडली गेल्याचं शिवसेना अन् भाजप पदाधिकाऱ्यांचही म्हणणं होतं. मात्र, आता भाजपनही इथे अधिकृत उमेदवार दिल्याने जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यात प्रणाली टिळवे या शिवसेनेकडून तर संध्या हळदणकर या भाजपच्या चिन्हावर रिंगणात आहेत. गौरी धुरी व अश्विनी पोकळे या अपक्ष ही रिंगणात आहेत. मात्र, जिल्ह्यात महायुती झालेली असताना आंबोली, मळेवाड नंतर आता कोलगाव पंचायत समिती मतदारसंघात दोस्तीत कुस्ती झालेली पहायला मिळत आहे.











