
देवगड : देवगड जि.प.आणि पं.स निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना आणखीनच रंगत येत आल्याचे स्पष्ट होत आहे. शिरगांव जि.प.मतदारसंघातील एकमेव उमेदवारी अर्ज अवैध ठरला असून छाननी प्रक्रियेत तांत्रिक कारणास्तव अपक्ष उमेदवार समीर भगवान शिरगावकर यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरवला आहे.शिरगाव मतदारसंघातून समीर शिरगावकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता.देवगड तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी आता खऱ्या अर्थाने रंगात आली आहे.
मात्र,छाननी दरम्यान असे आढळले की,त्यांच्या अर्जावर ज्या सूचकाने सही केली होती, त्याच सूचकाने दुसऱ्या एका उमेदवाराच्या अर्जावरही सही केली होती.निवडणूक नियमांनुसार,एका सूचकाला एकाच उमेदवाराच्या अर्जावर स्वाक्षरी करता येते.याबाबत अधिक माहिती देताना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आर.जे. पवार यांनी सांगितले की: "ज्या उमेदवाराचा अर्ज आधी सादर झाला होता, त्यावरील सूचकाची सही वैध धरण्यात आली आहे.मात्र, त्यानंतर त्याच सूचकाने समीर शिरगावकर यांच्या अर्जावर सही केल्यामुळे नियमांचे उल्लंघन झाले आणि त्यांचा अर्ज बाद करण्यात आला."त्यामुळे शिरगाव मतदारसंघात निवडणूक चुरशीची होणार हे मात्र नक्की शिरगाव मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी (SC) राखीव असून,येथे सर्वाधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.एकूण ६४ अर्जांपैकी एक अर्ज बाद झाल्याने आता उर्वरित उमेदवारांमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे.
देवगड तालुक्यातील पुरळ, पडेल, बापर्डे, पोंभुर्ले, शिरगाव, किंजवडे आणि कुणकेश्वर या सातही जिल्हा परिषद मतदारसंघांत चौरंगी-पंचरंगी लढतीचे चित्र स्पष्ट होत आहे. निवडणुकीच्या रिंगणात प्रमुख पक्षांसह इतर शक्तींनीही उडी घेतली आहेप्रमुख पक्ष असलेले भाजप, शिवसेना, उबाठा, काँग्रेस,मनसे, वंचित बहुजन आघाडी,रिपब्लिकन सेना, अपक्ष, मोठ्या संख्येने अपक्ष उमेदवारही नशीब आजमावत आहेत.जिल्हा परिषदेसोबतच पंचायत समितीसाठीही उमेदवारांची सख्या वाढली असून सर्वांचे लक्ष आता उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम मुदतीकडे लागले असून या अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत - २७ जानेवारी (दुपारी ३ ) वाजेपर्यंतअसणारआहे.त्यानंतरअंतिम उमेदवारी यादी जाहीर होऊन चिन्ह वाटप होणार आहे.











