
देवगड : मुंबई विद्यापीठाच्या कोकण विभागीय ॲथलेटिक्स स्पर्धेत देवगड येथील श्री एस. एच. केळकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत एक सुवर्ण, दोन रौप्य आणि तीन कांस्य पदकांची कमाई केली. या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर महाविद्यालयाच्या प्रेक्षा पुरुषोत्तम सांवत हिची विद्यापीठस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
देवरुख येथे झालेल्या या स्पर्धेत महाविद्यालयाच्या खेळाडूंनी विविध क्रीडाप्रकारांत आपली चमक दाखवली. ४०० मीटर हर्डल्स प्रकारात प्रथमेश सुनील पुजारे याने रौप्यपदक, तर मयुरेश सुनील पुजारे याने कांस्यपदक पटकावले. मयुरेश याने ११० मीटर हर्डल्स प्रकारातही कांस्यपदक मिळवून दुहेरी यश संपादन केले. गोळाफेक प्रकारात अनुश्का गुणनाथ कांबळणकर हिने रौप्यपदक मिळवले, तर महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला.
महिलांच्या पाच किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत हर्षला शक्तिकांत रूपले हिने कांस्यपदक पटकावले. स्टिपलचेस प्रकारात अमृता संतोष पुजारे हिने कांस्यपदक मिळवले. हॅप्थॅलॉन या बहुविध मैदानी क्रीडाप्रकारात प्रेक्षा पुरुषोत्तम सांवत हिने सुवर्णपदक मिळवत विशेष यश संपादन केले. या कामगिरीमुळे तिची विद्यापीठस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
महाविद्यालयाचे क्रीडा क्षेत्रातील सातत्यपूर्ण यश आणि खेळाडूंची मेहनत यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. खेळाडूंना मिळणारे मार्गदर्शन, नियमित सराव आणि जिद्द यांचा या यशात महत्त्वाचा वाटा आहे.
या सर्व यशस्वी खेळाडूंचे शिक्षण विकास मंडळ, देवगडचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, जिमखाना व क्रीडा समितीचे प्रमुख तसेच समितीतील सर्व सदस्यांनी हार्दिक अभिनंदन केले. आगामी स्पर्धांमध्येही खेळाडूंनी अशीच उज्ज्वल कामगिरी करून महाविद्यालयाचा आणि देवगड तालुक्याचा नावलौकिक वाढवावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








