
सावंतवाडी : सातार्डा- रायाचेपेड येथील मायलेकाने घरापासून तीनशे मीटरवर असलेल्या तेरेखोल नदिपात्रात एकमेकांच्या हाताला दोरी बांधून उडी घेत जीवन संपविले. शनिवारी रात्री त्यांनी ही आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी नदीपात्राच्या काठावर या दोघांचे चप्पल व बॅटरी आढळून आल्याने ही घटना उघडकीस आली.
श्रुतिका श्यामसुंदर आरोंदेकर (वय ६३) व तुकाराम उर्फ सुहास श्यामसुंदर आरोंदेकर (वय२७ ) अशी मायलेकांची नावे आहेत. स्थानिक ग्रामस्थ व गोवा व सावंतवाडी पोलिसांच्या मदतीने या दोघांचे मृतदेह रविवारी सायंकाळी चार वाजता बाहेर काढण्यात आले. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना समजताच सावंतवाडी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, सातार्डा दूरक्षेत्राचे पोलीस नागनाथ टक्केकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.
दुपार पर्यंत कोणतीही रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली नव्हती त्यामुळे मृतदेह बाहेर काढण्यात विलंब झाला. घटनास्थळी पोलीस पाटील विनिता मयेकर,सातोसे पोलीस पाटील संदीप सातार्डेकर, जि प सदस्य सुदन कवठणकर, पं स सदस्य उदय पारिपत्ये, सरपंच संदीप प्रभू यांनी घटनास्थळी भेट देत मदत कार्यात सहकार्य केले. अखेरीस पोलीस व स्थानिक ग्रामस्थांनी संयुक्त शोध मोहीम राबविली सुरुवातीला गोवा पोलिसांनी व सावंतवाडी पोलिसांनी बोटीच्या सहाय्याने मृतदेहाचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
परंतु, मृतदेह पाण्यात आतमध्ये असल्याने आढळून येत नव्हते त्यानंतर तेथील ग्रामस्थ राऊळ यांनी ज्या ठिकाणी मायलेकाने उडी घेतली त्या ठिकाणी गळ टाकून शोध घेतला असता दोन्ही मृतदेह गळाला सापडून आले दोन्ही मायलेखाने एकमेकांचे हात बांधलेले स्थितीत मृतदेह होते.
साधारण चार वाजता मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढले. त्यानंतर सदर मृतदेह सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले. आई आणि मुलगा दोन्हीच एकटी राहत असल्याने त्यांच्या पश्चात कोणीच नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
दरम्यान घटनास्थळी परिसर पंचनामा करत पोलिसांकडंन याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुलगा सुहास याने ऑनलाईन गेमिंग करिता मोबाईल वर कर्ज घेतले होते ते कर्ज वाढल्याने त्या तणावातून माय लेकांनी आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याचा अंदाज पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी वर्तवला आहे. या घटनेमुळे सातार्डा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नदीपात्रात आत्महत्या केलेल्या मायलेकांचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यात आपत्कालीन ‘रेस्क्यू टीम’ किंवा आवश्यक यंत्रणा उपलब्ध नसल्याची बाब समोर आली. त्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








