LIVE UPDATES

देवगडमध्ये अवैध पर्ससीन मासेमारीवर मत्स्य विभागाची कारवाई

‘स्वामीराज’ नौका जप्त; २६ परप्रांतीय खलाशी आढळले
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 25, 2026 07:47 PM
views 24  views

देवगड : देवगड बीच परिसरात अवैध पर्ससीन पद्धतीने मासेमारी करणाऱ्या ‘स्वामीराज’ नौकेवर मत्स्यव्यवसाय विभागाने रविवारी (२५ ऑक्टोबर) कारवाई करत नौका जप्त केली. सकाळी १० ते ११ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेली नौका देवगड बंदरात आणण्यात आली असून, या कारवाईचे पारंपरिक मच्छीमारांनी स्वागत केले आहे.

सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलबजावणी अधिकारी तथा परवाना अधिकारी देवगड किरण वाघमारे यांनी पोलीस प्रशासन आणि सुरक्षा रक्षकांच्या मदतीने ही कारवाई केली. देवगड किनाऱ्यासमोर अवघ्या तीन ते चार वाव पाण्यात पर्ससीन पद्धतीने मासेमारी सुरू असल्याची माहिती विभागाला मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित नौकेवर कारवाई केली. यावेळी अन्य काही पर्ससीन नौकांनी घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती आहे.