LIVE UPDATES

Devgad Fishermen Protest : कायकिंग पर्यटन आणि पारंपरिक मासेमारीचा वाद ऐरणीवर

मच्छीमारांचे देवगडमध्ये ‘जेल भरो’; पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 03, 2026 08:30 PM
views 35  views

देवगड : मिठमुंबरी-बागवाडी येथील कायकिंग पर्यटन व्यवसायावरून निर्माण झालेल्या वादाचे पडसाद मंगळवारी देवगडमध्ये उमटले. पारंपरिक मच्छीमारांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत आणि तक्रारीनुसार संबंधितांवरही कारवाई करावी, या मागणीसाठी ग्रामस्थ व मच्छीमारांनी देवगड पोलीस ठाण्यासमोर ‘जेल भरो’ आंदोलन छेडले.

माजी आमदार परशुराम उपरकर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक आणि युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले. आंदोलकांच्या जोरदार घोषणाबाजीने पोलीस ठाणे परिसर दणाणून गेला. अखेर पोलिसांनी अर्जाची चौकशी करून योग्य निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

मिठमुंबरी-बागवाडी येथे २६ ऑक्टोबर रोजी कायकिंग पर्यटन व्यवसायाच्या शुभारंभाच्या वेळी स्थानिक पारंपरिक मच्छीमारांनी विरोध दर्शविला होता. या घटनेनंतर सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे स्थानिक मच्छीमारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. संबंधित मच्छीमारांवरील गुन्हे मागे घ्यावेत, तसेच मच्छीमारांना त्रास देऊन धमकावल्याचा आरोप असलेल्या व्यक्तींविरोधातही कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती.

यासंदर्भात २७ ऑक्टोबर रोजी ग्रामस्थांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज सादर केला होता. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत दोन दिवसांत निर्णय कळविण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते. मात्र, दिलेली मुदत संपूनही ठोस निर्णय न झाल्याने अखेर ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला.

मंगळवारी सकाळी देवगड तहसीलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वारापासून आंदोलकांनी मोर्चाला सुरुवात केली. जोरदार घोषणाबाजी करत हा मोर्चा देवगड पोलीस ठाण्यावर धडकला. त्यानंतर पोलीस ठाण्यासमोर ‘जेल भरो’ आंदोलन करण्यात आले.

‘मच्छीमारांवरील गुन्हे मागे घ्या’, ‘पारंपरिक मच्छीमारांना न्याय द्या’, ‘जेटी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. मच्छीमारांवरील कारवाईचा निषेध व्यक्त करत आंदोलकांनी प्रशासनासमोर आपली भूमिका ठामपणे मांडली.

या आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, गाबीत समाजाचे व मच्छीमार नेते चंद्रशेखर उपरकर, उबाठा तालुकाप्रमुख रवींद्र जोगल, युवासेनेचे गणेश गावकर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर, तालुकाध्यक्ष उमेश कुलकर्णी, लक्ष्मण तारी, प्रमोद आडकर, संजय पराडकर, हर्षा ठाकूर, राजू वाळके यांच्यासह मिठमुंबरी-बागवाडीतील ग्रामस्थ आणि पारंपरिक मच्छीमार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आंदोलनादरम्यान आंदोलकांनी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मच्छीमारांनी यापूर्वी सादर केलेल्या तक्रार अर्जाची चौकशी करण्यात येईल आणि चौकशीअंती योग्य निर्णय घेतला जाईल, असे लेखी आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले. या आश्वासनानंतर आंदोलकांनी आपले आंदोलन मागे घेतले.

दरम्यान, मिठमुंबरी-बागवाडी येथील कायकिंग पर्यटन प्रकल्पासाठी वापरण्यात येणारी जेटी आणि पारंपरिक मच्छीमारांच्या उपजीविकेचा प्रश्न यावरून हा वाद निर्माण झाला आहे. पर्यटन विकासाला आमचा विरोध नाही; मात्र पर्यटन व्यवसायाच्या विस्तारामुळे पारंपरिक मासेमारी व्यवसायावर गदा येता कामा नये, अशी भूमिका स्थानिक मच्छीमारांनी मांडली आहे. आता पोलिसांकडून होणाऱ्या चौकशीत काय निष्पन्न होते आणि त्यानंतर कोणती भूमिका घेतली जाते, याकडे मिठमुंबरी-बागवाडीतील ग्रामस्थांसह मच्छीमारांचे लक्ष लागले आहे.


ताजी बातमी

View all

कणकवलीत भाजी मार्केटसाठी १९ लाखांचा निधी मंजूर
November 03, 2026
Kankavli Water Conservation : कणकवली कणकनगर येथील केटी बंधाऱ्यात लोखंडी प्लेटा बसविल्याने पाणीसाठ्यात मोठी वाढ
November 03, 2026
Sindhudurg Forest Department seizes tiger teeth and leopard claws during a wildlife trafficking crackdown in Kudal.
Kudal Wildlife Smuggling Racket : कुडाळ बस स्थानकावर वाघनखे, दातसुळ्यांच्या तस्करीचा वनविभागाने केला पर्दाफाश
November 03, 2026
Chipi Airport Sindhudurg to Navi Mumbai daily flight service announcement.
Sindhudurg to Navi Mumbai Flight Service : सिंधुदुर्ग-चिपी ते नवी मुंबई विमानसेवा आता आठवड्यातील सातही दिवस
November 03, 2026
संबंधित बातम्या

View all

कणकवलीत भाजी मार्केटसाठी १९ लाखांचा निधी मंजूर
November 03, 2026
Kankavli Water Conservation : कणकवली कणकनगर येथील केटी बंधाऱ्यात लोखंडी प्लेटा बसविल्याने पाणीसाठ्यात मोठी वाढ
November 03, 2026
Sindhudurg Collector Trupti Dhodmise inspects grass harvesting and fodder storage demonstration at Kasal.
कसाल येथील गवत कापणी प्रात्यक्षिकास जिल्हाधिकारी, सीईओ, उपाध्यक्षांनी दिली भेट
November 03, 2026
Siddhesh Ravrane inaugurates Jaltara and soak pit water conservation works at Sadure in Vaibhavwadi.
Vaibhavwadi Water Conservation : दुष्काळसदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारणाची लोकचळवळ उभारूया
November 03, 2026