
दोडामार्ग : घोटगेवाडी येथील पुलावरून तिलारी नदीच्या पात्रात सोमवारी सायंकाळी सहा वर्षीय मुलासह एक युवक वाहून गेल्याची घटना घडली. अनुरंजन किसपोट्टा बिजापन्नी (२५) आणि रेगण दिलीप बडा (६), दोघेही मूळचे छत्तीसगड येथील रहिवाशी सध्या रा. घोटगेवाडी अशी त्यांची नावे आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता. मात्र या दुर्घटनेनंतर अनभिज्ञ राहिलेल्या तालुका आपत्ती व्यवस्थापन विभागावर मात्र गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहे.
अनुरंजन हे रोजगारासाठी घोटगेवाडी येथे मजुरीचे काम करीत होते. सोमवारी सायंकाळी सुमारे ५.१५ वाजता ते रेगणसोबत घोटगेवाडी येथील कॉजवेवर गेले होते. त्यावेळी तिलारी नदीच्या पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने दोघेही पाण्यात वाहून गेले. त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली; मात्र काही क्षणांतच ते प्रवाहात दिसेनासे झाले. घटनेची माहिती मिळताच कोनाळचे उपसरपंच रत्नकांत कर्पे यांच्यासह ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. दोघांना वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र नदीच्या जोरदार प्रवाहामुळे त्यात यश आले नाही. प्रशासनाला माहिती मिळाल्यानंतर अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली. मात्र अंधार पडल्याने शोधकार्यात अडथळे निर्माण झाले. त्यामुळे रात्री शोधमोहीम थांबविण्यात आली. काही ग्रामस्थांनी ड्रोनच्या मदतीनेही नदीपात्र व परिसरात शोध घेण्याचा प्रयत्न केला. तरीही रात्री उशिरापर्यंत दोघांचा ठावठिकाणा लागला नाही.
धरणातून पाणी सोडल्याने प्रवाह वाढला
तेरवण मेढे उन्नैयी बंधारा तसेच तिलारी धरणातील अतिरिक्त पाणी तिलारी नदीत सोडले जाते. त्यामुळे नदीचा प्रवाह वेगाने सुरू होता. पाण्याची पातळीही वाढलेली होती. याच प्रवाहात दोघे वाहून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
बोट उपलब्ध नसल्याचा मुद्दा ऐरणीवर
पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीत बचावकार्य जलदगतीने करता यावे, यासाठी तालुका मुख्यालयात बोट उपलब्ध ठेवण्याची व्यवस्था केली जाते. मात्र यंदा अद्याप बोट उपलब्ध नसल्याची बाब पत्रकारांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना तातडीने बोट उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र या सूचनेनंतरही बोट उपलब्ध झाली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचने कडे दुर्लक्ष झाले की काय? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
घटनेची माहिती उशिरा मिळाल्याने प्रश्न
घोटगेवाडी येथे गंभीर दुर्घटना घडूनही तालुका आपत्ती व्यवस्थापन विभागाला घटनेची माहिती सुमारे तासभर मिळाली नसल्याचे स्पष्ट झाले. पत्रकारांनी विभागाशी संपर्क साधल्यानंतरच दुर्घटनेची माहिती मिळाल्याचे समोर आले. त्यामुळे पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापनाची तयारी आणि प्रत्यक्ष यंत्रणेची कार्यक्षमता याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.












