
Ajinkya Rahane Retirement : भारतीय क्रिकेटमधील अनुभवी फलंदाजांपैकी एक असलेल्या अजिंक्य रहाणेने क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती जाहीर केली आहे. गुरुवारी रहाणेने सोशल मिडियावर एक भावूक पोस्ट शेअर करून आपल्या शानदार कारकिर्दीच्या समाप्तीची घोषणा केली. रहाणेने आयपीएलच्या मागील सीझनमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचे नेतृत्व केले होते, परंतु आता तो या टी-२० लीगमध्येही खेळणार नाही.
इंन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओ पोस्टमध्ये अजिंक्य रहाणेने म्हटले की, "कॅप २७८ चा आज इथेच शेवट होत आहे. गेल्या काही वर्षांत क्रिकेट प्रेमींनी दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार. मी सदैव तुमचा ऋणी राहीन." या संदेशाद्वारे त्याने त्याचे चाहते, सहकारी खेळाडू, प्रशिक्षक आणि भारतीय क्रिकेटशी संबंधित असलेल्या प्रत्येकाचे आभार मानले. यावेळी तो भावनूक झालेला दिसून आला.
अजिंक्य रहाणेचे फलंदाजी आणि कर्णधारपदातील कारकीर्द
भारतीय संघाचे तिन्ही प्रकारांत नेतृत्व करणारा अजिंक्य रहाणे हा मोजक्या भारतीय खेळाडूंपैकी एक आहे. त्याची कर्णधारपदाची कामगिरीही प्रभावी होती. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने भारताचे सहा सामन्यांत नेतृत्व केले. त्यापैकी संघाने चार सामने जिंकले, तर दोन सामने अनिर्णित राहिले. विशेष म्हणजे, त्याच्या नेतृत्वाखाली भारताला एकही कसोटी सामना गमवावा लागला नाही. एकदिवसीय क्रिकेटमध्ये रहाणेने तीन सामन्यांत नेतृत्व केले आणि त्या तिन्ही सामन्यांत भारताचा विजय झाला. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने दोनदा संघाचे नेतृत्व केले, ज्यात एक विजय आणि एका पराभवाचा समावेश होता. आयपीएलमध्ये रहाणेने कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स, रायझिंग पुणे सुपरजायंट, दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स या संघांचे प्रतिनिधित्व केले. त्याने २१२ आयपीएल सामन्यांत ५,३६७ धावा केल्या. तर रहाणेने भारतासाठी ८५ कसोटी, ९० एकदिवसीय आणि २० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. तिन्ही प्रकारांत मिळून त्याने ८,४१४ धावा केल्या.
अजिंक्य रहाणेची कसोटी क्रिकेटमधील कारकीर्द
- ८५ सामने सामने खेळला तर एकूण ५,०७७ धावा काढल्या
- १२ शतके, २६ अर्धशतके, ४९.५० स्ट्राईक रेट
- ५७८ चौकार, ३५ षटकार
अजिंक्य रहाणेची एकदिवसीय क्रिकेटमधील कारकीर्द
- ९० सामने, २,९६२ धावा, ३५.२६ सरासरी
- ३ शतके, २४ अर्धशतके, ७८.६३ स्ट्राईक रेट
- २९३ चौकार, ३३ षटकार
अजिंक्य रहाणेची टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारकीर्द
- २० सामने, ३७५ धावा, २०.८३ सरासरी
- १ अर्धशतक, ११३.२९ स्ट्राईक रेट
- ३२ चौकार, ६ षटकार














