
वैभववाडी : तालुक्यातील बुद्धिबळपटू विहान राहुल अस्पतवार याने बुद्धिबळ आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त केले आहे. अवघ्या नऊव्या वर्षी बुद्धिबळाच्या तिन्ही प्रकारांत आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवून त्याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. बुद्धिबळाच्या तिन्ही प्रकारांत आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचे मानांकन मिळविणारा दहा वर्षांखालील वयोगटातील तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला खेळाडू ठरला आहे. त्याच्या या कामगिरीमुळे जिल्ह्याच्या बुद्धिबळ क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
विहानने वयाच्या सहाव्या वर्षापासून बुद्धिबळ खेळण्यास सुरुवात केली. अवघ्या तीन वर्षांच्या कालावधीत सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले. ग्रामीण भागात बुद्धिबळासाठी मर्यादित सुविधा असतानाही त्याने आपल्या खेळात सातत्याने प्रगती केली. लहान वयातच आंतरराष्ट्रीय स्तरावर मानांकन मिळविण्याची कामगिरी त्याने साध्य केली आहे.
त्याने पारंपरिक बुद्धिबळ प्रकारात १५००, जलद बुद्धिबळ प्रकारात १४८०, तर अतिजलद बुद्धिबळ प्रकारात १४९२ असे आंतरराष्ट्रीय मानांकन मिळविले आहे. नुकत्याच बेळगाव येथे झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेत त्याने जलद आणि अतिजलद या दोन्ही प्रकारांत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. त्यातून त्याला आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त झाले. यापूर्वीच त्याने पारंपरिक बुद्धिबळ प्रकारात १५०० मानांकन मिळविले होते. त्यामुळे बुद्धिबळाच्या तिन्ही प्रकारांत आंतरराष्ट्रीय मानांकन मिळविण्याची त्याची कामगिरी विशेष ठरली आहे.
विहानच्या या यशामागे आई-वडिलांचे प्रोत्साहन आणि त्याग महत्त्वाचा ठरला आहे. त्याच्या या यशात प्रदीप पाटील , बाबुराव पाटील (कोल्हापूर), अविजीत रे (गोवा), श्रीकृष्ण आडेलकर (कणकवली), विजयकुमार माने (सांगली) आणि अक्षय देवलकर (वैभववाडी) यांचे मोलाचे योगदान आहे. अल्पवयातच बुद्धिबळाच्या तिन्ही प्रकारांत आंतरराष्ट्रीय मानांकन मिळविण्याची कामगिरी करणाऱ्या विहानचे जिल्हाभरातून कौतुक होत आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








