'आर्चरी'मध्ये‌ सिंधुकन्येची विजयी घोडदौड

अक्सा शिरगांवकरने कमावलं तिसरं सिल्व्हर मेडल
Edited by:
Published on: March 06, 2025 11:25 AM
views 81  views

रत्नागिरी : धनुर्विद्या (आर्चरी) प्रकारात गेल्या दोन वर्षांपासून अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये 'मेडल्स'ना गवसणी घालणाऱ्या कणकवली येथील अक्सा मुदस्सर शिरगांवकर या १२ वर्षीय सिंधुकन्येने आता आणखी एका राज्यस्तरीय स्पर्धेत 'सिल्व्हर मेडल्स'ना गवसणी घातली आहे. महाराष्ट्र आर्चरी असोसिएशन यांच्यातर्फे डेरवण (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत अक्सा हिने तब्बल तीन 'सिल्व्हर‌ मेडल्स' प्राप्त केली आहेत. विशेष म्हणजे दरवर्षी होणारी ही स्पर्धा गतवर्षी अमरावती येथे झाली होती, तेव्हा अक्सा हिने 'गोल्ड मेडल'ही पटकावले होते.

स्पर्धेत अक्सा हिने १३ व १५ वर्षांखालील वयोगटामध्ये सहभाग घेतला होता. यातील १५ वर्षांखालील 'कंपाऊंड' प्रकारात एक 'सिल्व्हर मेडल' तर १३ वर्षांखालील 'स्कोरींग राऊंड' व 'एलिमिनेशन राऊंड' या प्रकारात दोन‌ 'सिल्व्हर मेडल्स' अक्सा हिने प्राप्त केली आहेत. २८ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत पार पडलेल्या या स्पर्धेत राज्यभरातील १२०० स्पर्धक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे १५ वर्षांखालील गटात अवघ्या दोन 'पॉईंट्स'नी‌ अक्सा हिचे सुवर्णपदक हुकले. मात्र, एकाच स्पर्धेत सलग दोन वर्षे पदक प्राप्त करण्याचा मान तिने मिळवला आहे.

अक्सा हिने यापूर्वी देखील अनेक राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश प्राप्त केले आहे. यामध्ये सीबीएसई बोर्डातर्फे पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत पाचवी 'रँक' प्राप्त करुन तिने राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड निश्चित केली होती. तीच राष्ट्रीय स्पर्धा नवी दिल्ली येथे पार पडली, तेथेही अक्सा हिने सहावी 'रँक' प्राप्त केली. त्यानंतर नादियाड (राज्य गुजरात) येथे झालेल्या 'नॅशनल‌ स्कुल गेम्स ऑफ आर्चरी २०२४ - २५'मध्ये अक्सा हिने 'कंपाऊंड' प्रकारात महाराष्ट्राच्या संघाचे प्रतिनिधित्व केले. या संघाने स्पर्धेत 'सिल्व्हर मेडल' प्राप्त केले होते. यासह अनेक स्पर्धांमध्ये तिने यश मिळवले आहे.

अक्सा ही कणकवली येथील पोद्दार इंटरनॅशनल स्कुलमध्ये सातवीत शिकत आहे. गेल्या दोन वर्षांपासून ती सातारा येथील दृष्टी आर्चरी ऍकॅडमीमध्ये प्रशिक्षक प्रविण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. आपल्या यशामध्ये वडील तथा प्रतिथयश शासकीय ठेकेदार मुदस्सर शिरगांवकर, आई तथा बचतगटाच्या माध्यमातून प्रभावी कामगिरी करणाऱ्या, अनेक ‌महिलांना रोजगार मिळवून देणाऱ्या सौ. तन्वीर शिरगावकर यांचा मोलाचा वाटा असून त्यांच्याच खंबीर पाठिंब्यामुळे हे यश प्राप्त होत असल्याचे अक्सा हिने सांगितले. येत्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देखील सहभागी होण्याची संधी मिळेल‌, असा विश्वासही अक्सा हिने व्यक्त केला आहे. अक्सा हिच्या यशाबद्दल तिचे क्रीडा क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.