
सावंतवाडी : तालुक्यातील वाफोली विलवडे गावांमध्ये लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या बॅक वाॅटर लगत असलेल्या तीन ते चार दगडखाणी आणि पाच सहा क्रशर्स या विरोधात ग्रामस्थांनी आणि महिलांनी काल एल्गार पुकारला. लघुपाटबंधारे धरणापासून नजिकच्या अंतरात असलेल्या या दगडखाणींमध्ये दिवसाच नव्हे तर रात्री मध्यरात्री ब्लास्टिंग केले जात आहे. परवाना नसलेल्या या क्रशर्स आणि क्वारीज् कायमस्वरूपी बंद होणे गरजेचे आहे असं मत सामाजिक कार्यकर्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांनी व्यक्त केले आहे.
ते म्हणाले, एकामागोमाग एक अशा पाच सहा क्रशर्स मधून मोठ्या प्रमाणावर धुळ आसमंतात पसरत आहे.क्रशर्सच्या मशिनरींच्या आवाजाने ग्रामस्थांची झोप उडालेली आहे. अनेक वृद्ध ग्रामस्थांना, लहान मुलांना आणि महिलांना रक्तदाब,दमा असे आजार जडलेले आहेत. जनप्रक्षोभ वाढत असलेला बघता तहसीलदार साहेब तिथे पोहचून त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात सदर क्वारीज् आणि क्रशर्स बंद ठेवण्याचे आदेश दिले त्याचे स्वागत आहे पण एखाद्या धरण प्रकल्पाच्या एवढ्या जवळ असलेल्या अशा प्रकल्पांना मुळात परवानगी मिळालीच कशी? कोणी दिली? याची कसून चौकशी होणे आवश्यक आहे.वाफोली विलवडे लगत भालावल हे इको सेन्सिटिव्ह गाव आहे.
अशा भागात दगडखाणी असणे हे वन्यजीवांसाठी देखील धोकादायक आहे. वन्यजीव (गवे रेडे,सांबर इत्यादी) यांचे विस्थापन होऊन ते आसपासच्या बागायती शेती क्षेत्रात आणि गावातच काय पण शहरी भागात देखील दिसून येत आहेत त्याची हीच कारणे आहेत.
लघुपाटबंधारे क्षेत्रात दगडखाणी, क्रशर्स सुरू आहेत मग पाटबंधारे खाते काय करत होते? ही देखील चौकशी होणे गरजेचे आहे. तात्पुरती बंद केलेल्या या दगडखाणी, क्रशर्स कायमस्वरूपी बंद करण्यात याव्यात असे डॉ. परूळेकर यांनी म्हटले आहे.











