नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. या सुनावणी दरम्यान दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात उत्तर सादर केलं आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या वकिलांकडून सुप्रीम कोर्टात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर ताशेर ओढण्यात आले होते. निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह आणि नावाबद्दल निकाल देताना दुजाभाव केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आलेला. या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने केंद्रीय निवडणूक आयोगाला उत्तर सादर करण्याचे आदेश दिलेले. त्यानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात दहा पानी उत्तर सादर केलंय.
केंद्रीय निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात सादर केलेल्या उत्तरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चिन्ह देण्याचा निर्णय हा कायद्यानुसार योग्य असल्याचं म्हटलं आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर केलेले आरोप हे चुकीचे आहेत. आम्ही हा निर्णय संविधानाला अनुसरून घेतला आहे. आम्ही हा निर्णय नियमांनुसारच घेतला आहे, असं निवडणूक आयोगाने आपल्या दहा पानी उत्तरात म्हटलं आहे.
दरम्यान, सुप्रीम कोर्टात आज सुनावणीवेळी शिंदे गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. या सुनावणीवेळी राज्यपालांचे वकील तुषार मेहता यांनी जोरदार युक्तिवाद केला. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यावेळी बहुमत चाचणी घेण्यासाठी अधिवेशन बोलावण्याची मागणी करणं ही त्यावेळची परिस्थिती होती, असा युक्तिवाद त्यांनी केला. पण सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली. राज्यपालांनी बहुमताची चाचणीसाठी अधिवेशन बोलावणं हे सरकार पाडण्याचं पाऊल होतं, असं सरन्यायाधीश म्हणाले.