रंग, श्रद्धा आणि परंपरेचा संगम

भेडशी शिमगोत्सवाची दिमाखदार सांगता
Edited by: संदीप देसाई
Published on: March 16, 2026 19:54 PM
views 16  views

दोडामार्ग : पंधरा दिवस रंगणाऱ्या भेडशी गावच्या पारंपरिक शिमगोत्सवाची सोमवारी रंगांच्या उधळणीत आणि भक्तिभावाने भरलेल्या धुळवडीच्या सोहळ्यात उत्साहपूर्ण सांगता करण्यात आली. ग्रामस्थ, माहेरवाशिणी, नातेवाईक आणि परिसरातील भक्तगण यांच्या मोठ्या उपस्थितीत हा सोहळा जल्लोषात पार पडला. भेडशी येथील श्री देव दामोदर देवस्थानचा पंधरा दिवसांचा शिमगोत्सव हा गावाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा अविभाज्य भाग मानला जातो. होळीपासून या उत्सवाची सुरुवात होते. अकराव्या दिवसापासून मांड धरला जातो आणि पुढील पाच दिवस धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. या काळात गावातील ग्रामस्थ एकत्र येऊन नाटके सादर करतात, विविध पारंपरिक विधी पार पाडले जातात आणि उत्सवाला विशेष रंग चढतो.

होळीच्या पंधराव्या दिवशी सकाळी मांड धरल्यानंतर चोर खेळ, गाऱ्हाणी बोलणी, नवस फेड यांसारखे धार्मिक कार्यक्रम पार पडतात. गावातील लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वजण, तसेच महिला वर्ग रंगांची उधळण करत शिमगोत्सवाचा आनंद लुटतात. श्री देव दामोदर तसेच अठ्ठेचाळीस देव-देवतांच्या चरणी प्रार्थना करून भक्त नवस बोलतात.

भेडशी शिमगोत्सवातील रोबांट कार्यक्रम विशेष आकर्षण ठरतो. श्री देव दामोदर यांच्या मांडावर मानकरी यांच्या माध्यमातून भक्तांची गाऱ्हाणी मांडली जातात आणि ती पूर्ण होतात, अशी श्रद्धा असल्यामुळे या कार्यक्रमाला माहेरवाशिणी, नातेवाईक तसेच परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी धुळवड आणि न्हावन या पारंपरिक विधींनी पंधरा दिवस चाललेल्या भव्य शिमगोत्सवाची उत्साहात सांगता करण्यात आली.