
सिंधुदुर्ग :कोकणातील आंबा व काजू बागायतदारांच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी राज्य शासन स्तरावर महत्त्वाची बैठक उद्या १७ मार्च ला मंत्रालयात आयोजित करण्यात आली आहे. दुपारी ३.१५ वाजता मंत्रालय, मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली आहे.
सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकणातील आंबा व काजू प्रश्नासंदर्भात ही बैठक होणार असून यावेळी बागायतदारांच्या समस्या, उत्पादन, बाजारपेठ, निर्यात, विमा, तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान या मुद्द्यांवर या बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे.
या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , सुनेत्रा पवार , उद्योगमंत्री उदय सामंत , कृषिमंत्री दत्तात्रय भरणे , फलोत्पादन मंत्री Bharat गोगावले , मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे , महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे , गृहराज्यमंत्री योगेश कदम उपस्थित राहणार आहेत.
तसेच खासदार नारायण राणे , सुनील तटकरे , आमदार किरण सामंत , निलेश राणे , महेंद्र थोरवे , रवींद्र वाईकर , विनोद निकोले , राजेंद्र गावीत , किशन कथोरे , हर्षवर्धन भावे , निलेश लंके , दिलिप लांडे , सुनील प्रभू , अनिकेत तटकरे , प्रवीण दरेकर , निरंजन डावखरे यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणातील आंबा-काजू बागायतदारांच्या प्रश्नांबाबत आपण शासन स्तरावर बैठक घेऊ, असा शब्द मंत्री नितेश राणे यांनी नुकत्याच सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या शेतकरी मोर्चाला सामोरे जाताना दिला होता. त्या शब्दाला अनुसरून त्यांनी ताकदीने पाठपुरावा केल्याने ही महत्वपूर्ण बैठक उद्या प्रत्यक्षात होत आहे.
या बैठकीत आंबा व काजू उत्पादकांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय होतील, अशी अपेक्षा कोकणातील बागायतदार व्यक्त करत आहेत. त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण कोकणवासीयांचे लक्ष लागले आहे.










