नायजेरिया: शाळेची इमारत कोसळून २२ विद्यार्थी ठार

१०० हून अधिक जखमी
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: July 13, 2024 09:11 AM
views 455  views

अबुजा : उत्तर-मध्य नायजेरियात शुक्रवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. येथे वर्ग सुरू असताना दोन मजली शाळा कोसळली.या दुर्घटनेत २२ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, घटनास्थळी मदत आणि बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत.

वर्ग सुरू असताना इमारत कोसळली

समोर आलेल्या माहितीनुसार, प्लेटो प्रांतातील सेंट बुसा बुजी कम्युनिटी महाविद्यालयात वर्ग सुरू झाल्यानंतर काही वेळातच शाळेची इमारत कोसळली. अपघातात जखमी झालेल्यांमध्ये १५  वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाची मुले असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार एकूण १५४ विद्यार्थी अडकले होते, परंतु त्यापैकी १३२ जणांना वाचवण्यात यश आले आहे. या विद्यार्थ्यांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात २२  विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.


घटनास्थळी बचाव कर्मचारी तैनात

अपघातानंतर लगेचच बचाव आणि आरोग्य कर्मचारी तसेच सुरक्षा दलांना घटनास्थळी तैनात करण्यात आले. तत्पर वैद्यकीय सेवा सुनिश्चित करण्यासाठी, सरकारने रुग्णालयांना कोणत्याही प्रकारची कागदपत्रे किंवा पैसे न देता उपचार करण्यास प्राधान्य देण्याचे निर्देश दिल्याचे प्लेटो प्रांत माहिती आयुक्त मुसा अशोम्स यांनी एका निवेदनात म्हटले आहे. या दुर्घटनेसाठी राज्य सरकारने शाळेची कमकुवत रचना आणि शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांना जबाबदार धरले.