
फ्लोरिडा : फ्लोरिडातील टॅलाहासी येथे, फ्लोरिडा ए अँड एम युनिव्हर्सिटी मधील 'होमकमिंग वीकेंड' उत्सवादरम्यान शनिवारी फुटबॉल स्टेडियमजवळ गोळीबाराची एक मोठी घटना घडली. या अंदाधुंद गोळीबारात ६ निष्पाप मुलांसह किमान १२ जण गंभीर जखमी झाले आहेत.
टॅलाहासी पोलीस विभागाच्या माहितीनुसार, जखमींपैकी ३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे, तर उर्वरित ९ जणांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, ही घटना विद्यापीठातील फुटबॉल सामना संपल्यानंतर काही वेळातच घडली. स्टेडियमजवळ मोठी गर्दी जमलेली असताना काही व्यक्तींमध्ये वाद झाला. याचे रूपांतर हाणामारीत झाले. हा वाद लवकरच हिंसक वळणावर पोहोचला आणि त्यानंतर गोळीबार सुरू झाला.
टॅलाहासीचे पोलीस प्रमुख लॉरेन्स रेवेल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, जखमींमध्ये लहान मुलांचा समावेश असणे अत्यंत दुख:द आहे. पोलीस आणि आपत्कालीन वैद्यकीय पथके त्वरित घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी जखमींना रुग्णालयात हलवले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.
पोलीस प्रमुख लॉरेन्स रेवेल यांनी सांगितले की, हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले असून आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. गुन्हेगारांची ओळख पटवण्यासाठी पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी करत आहेत.
दरम्यान, फ्लोरिडा ए अँड एम युनिव्हर्सिटीने सोशल मीडियावर एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. त्यात स्पष्ट केले आहे की, जरी ही घटना कॅम्पसच्या अगदी जवळ घडली असली तरी आता परिस्थिती नियंत्रणात आहे आणि संपूर्ण विद्यापीठ परिसर सुरक्षित आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








