12 वीच्या परीक्षेला सुरुवात

सिंधुदुर्गातील 23 परीक्षा केंद्रांवर परीक्षा
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: February 10, 2026 16:30 PM
views 36  views

सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेला आज इंग्रजी विषयाच्या पेपरने सुरुवात झाली. कोकण विभागीय मंडळ अंतर्गत एकूण २४,०१० विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ३८ परीक्षा केंद्रांवर १५,७१३, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ परीक्षा केंद्रांवर ८,२९७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

परीक्षा पारदर्शक आणि गैरप्रकारमुक्त व्हावी यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवरील प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात केवळ चिपळूण येथील एका परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही नसल्याने तेथे आज व्हिडिओ शूटिंगद्वारे देखरेख करण्यात आली.

परीक्षेच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) दीपक मेंगाने यांनी जाकादेवी व वाटद खंडाळा येथील परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिक्षण अधिकारी कविता शिंपी यांनीही विविध परीक्षा केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. भरारी व बैठकी पथकेही परीक्षा केंद्रांवर तैनात ठेवण्यात आली होती.

दोन्ही जिल्ह्यांत परीक्षा सुरळीत व शांततेत पार पडली असून कोणत्याही गैरप्रकाराची नोंद झालेली नाही. प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्हीच्या निगराणीखाली परीक्षा होत असल्याने शिस्तबद्ध वातावरणात परीक्षा पार पडत आहे.

दरम्यान, कोकण विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगितले की, “दोन्ही जिल्ह्यांत दक्षता समितीचे अध्यक्ष असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सहकार्याने परीक्षेचे योग्य नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाच्या मदतीने आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून परीक्षा सुरळीत पार पडतील. गैरप्रकार करणारे, त्यांना मदत करणारे किंवा उत्तेजन देणारे यांची कोणतीही गय केली जाणार नाही.”