
दोडामार्ग : तालुक्यातील ज्येष्ठ सामाजिक व राजकीय नेते, भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी रमेश अर्जुन दळवी यांचे सोमवारी रात्री त्यांच्या राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने बोडदे–टेंबवाडीसह संपूर्ण दोडामार्ग तालुक्यात शोककळा पसरली आहे.
रमेश दळवी यांनी आपल्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या. त्यांनी सुरवातीला, शिवसेना त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष म्हणून कार्य केले होते. तसेच माजी सैनिक बँकेचे चेअरमन म्हणूनही त्यांनी प्रभावी योगदान दिले होते.
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे ते निकटवर्तीय कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. ना. राणे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर दळवी यांनीही शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. “जिथे राणे साहेब, तिथे दळवी” अशी त्यांची राजकीय ओळख निर्माण झाली होती.
कालांतराने ते भारतीय जनता पक्षात दाखल झाले आणि भाजपमध्येही जेष्ठ पदाधिकारी म्हणून सक्रिय भूमिका बजावत होते. त्यांच्या निधनाने एक अनुभवी, स्पष्टवक्ते आणि तळागाळातील जनतेशी नाळ जपणारे नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.











