घोटगेत गणेशसह इतर पाच हत्ती ठाण मांडून

Edited by: लवू परब
Published on: February 10, 2026 16:38 PM
views 84  views

दोडामार्ग : गेल्या महिन्याभरापासून तालुक्यातील घोटगे गावात गणेशसह इतर पाच हत्ती ठाण मांडून आहेत. शेतकऱ्यांच्या ऐन काजू हंगामात हे शेतकरी असल्याने शेतकऱ्यांचे काजूबीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे संपूर्ण काजू हंगामाची नुकसान भरपाई येथील शेतकऱ्यांना एकरकमी अदा करावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे.

घोटगे येथे 6 हत्ती शेतीबागायतीचे नुकसान करत असताना तिलारी खोऱ्यात तब्बल महिनाभरानंतर पुन्हा एकदा बाहुबली  टस्कराची एन्ट्री झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास बाहुबली सोनावल परिसरात दाखल झाला आहे. याच्या पुनरागमनामुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये मोठी धास्ती पसरली आहे.

सध्या या खोऱ्यात गणेश टस्कर, ओंकारसह एकूण सहा हत्तींच्या कळपाचा वावर सुरू आहे. हत्ती घोटगे परिसरात मागील काही दिवसांपासून ठाण मांडून बसले आहेत. येथील शेती व फळबागायतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहेत. विशेषतः काजू, केळी तसेच इतर पिकांचे नुकसान वाढल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. गेल्या वर्षी वर्चस्वासाठी गणेश टस्कर आणि बाहुबली टस्कर यांच्यात जोरदार संघर्ष झाला होता. त्यावेळी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यंदाही हे दोन्ही बलाढ्य टस्कर पुन्हा आमने-सामने आले, तर तसाच संघर्ष होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

सध्या काजूचा हंगाम जोरात सुरू असून, हत्तींच्या वाढत्या वावरामुळे शेतकऱ्यांना काजू बागांमध्ये जाणेही धोकादायक बनले आहे. त्यातच हत्तींच्या वाढत्या वावरामुळे धोका अधिक वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर काजू बागेत जावे की नाही, असा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. वनविभागाने या परिसरात तातडीने उपाययोजना कराव्यात. हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवून शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसह शेतीचे नुकसान थांबवावे, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.