
वेंगुर्ला : तालुक्यातील अणसूर गावात गेल्या दीड वर्षापासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून, आता दिवसाढवळ्याही बिबट्याचे दर्शन होऊ लागल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बिबट्याने आतापर्यंत सुमारे १५ ते २० गुरांचा फडशा पाडल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी अणसूर सरपंच यांनी केली आहे.
अणसूर गाव परिसरात बिबट्याचा वावर असल्याची माहिती वनविभागाला अनेक वेळा देण्यात आली. मात्र, वारंवार कळवूनही वनविभागाकडून अपेक्षित ती कार्यवाही होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. गेल्या दीड वर्षात बिबट्याने अनेक पाळीव जनावरांवर हल्ला केल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात नुकसान झालेल्या काही शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम मिळाली असली, तरी काही नुकसानग्रस्तांना अद्यापही भरपाई मिळालेली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे एकीकडे गुरांचे नुकसान आणि दुसरीकडे भरपाईसाठी करावी लागणारी धावपळ, अशा दुहेरी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.
विशेष म्हणजे, बिबट्याचा वावर आता मानवी वस्तीजवळही वाढल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. रात्रीच्या वेळी बिबट्या वस्तीजवळ येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दिवसा शेतकऱ्यांची गुरे रानात चरायला असतात. याच काळात बिबट्या गुरांवर झडप घालत असल्याने शेतकरी स्वतःही रानात जाण्यास घाबरत आहेत.
शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर
बिबट्याच्या वाढत्या संचारामुळे केवळ पशुधनाचेच नव्हे, तर मानवी सुरक्षिततेचेही आव्हान निर्माण झाले आहे. शेतकरी, महिला आणि नागरिकांना रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना भीती वाटत आहे. त्यामुळे वनविभागाने केवळ पंचनामे आणि नुकसानभरपाईपुरती कार्यवाही न करता बिबट्याचा वावर रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
१५ दिवसांचा अल्टिमेटम
दरम्यान, येत्या १५ दिवसांत वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करून ग्रामस्थांना दिलासा दिला नाही, तर अणसूरमधील ग्रामस्थांना सोबत घेऊन वनविभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा सरपंच अणसूर यांनी दिला आहे.
बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे अणसूरमधील ग्रामस्थ आणि शेतकरी चिंतेत असून, वनविभाग आता या गंभीर प्रश्नावर कोणती भूमिका घेतो आणि बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी कोणती ठोस पावले उचलतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












