मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला मिळालेल्या धगधगत्या मशाल या चिन्हावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दिवगंत नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पार्टीने मशाल चिन्हावर दावा केला असून अंधेरीतील पोटनिवडणुकीत उमेदवार उभा करणार असल्याची घोषणा केली आहे. समता पार्टीने निवडणूक आयोगाला ई-मेल पाठवून चिन्हावर दावा केला आहे.
शिवसेनेत फूट पडल्यावर शिंदे गटाने शिवसेना पक्षावर दावा केला होता. निवडणूक आयोगाने शिवसेना हे मूळ वापरण्यास मनाई करताना दुसरीकडे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हही गोठवले. त्यानंतर दोन्ही गटांना निवडणूक चिन्ह आणि नाव देण्यात आले.
शिवसेना ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने मशाल हे चिन्ह दिले. मशाल हे चिन्ह समता पार्टीसाठी देण्यात आले होते. मात्र, 2004 मध्ये निवडणूक आयोगाने या पक्षाची प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता रद्द करताना चिन्ह खुले केले होते. त्यामुळे ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने मशाल हे चिन्ह दिले.