
सावंतवाडी : शिवसेनेचे वेंगुर्ले तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांच्यासह उपजिल्हाप्रमुख सुहास कोळसुलकर व महिला तालुकाप्रमुख दिशा शेटकर यांच्या राजीनाम्यानंतर आता वेंगुर्ले तालुक्याची व शहराची संपूर्ण कार्यकारिणीच बरखास्त करण्यात आली आहे. महिला पदाधिकाऱ्यांनी दिलेले राजीनामे देखील स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. विद्यमान उप जिल्हाप्रमुख सचिन देसाई यांच्याकडे प्रभारी तालुकाप्रमुख म्हणून जबाबदारी देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषद निवडणूकानंतर नवीन कार्यकारिणी नियुक्त करण्यात येईल असेही ते म्हणाले. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शिवसेनेचे वेंगुर्ले तालुकाप्रमुख श्री मांजरेकर यांनी अलीकडेच आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाप्रमुख संजू परब यांच्याकडे सुपूर्द केला होता. त्यानंतर उपजिल्हाप्रमुख सुहास कोळसुलकर, महिला तालुकाप्रमुख दिशा शेटकर, युवती तालुकाप्रमुख योगिता कडुलकर यांनीही आपल्या पदांचे राजीनामे दिले. वैयक्तिक कारणास्तव आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले होते.या राजीनामा सत्रानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी या प्रकरणावर पडदा टाकला. त्यांनी संपूर्ण तालुका व शहर कार्यकारणीच बरखास्त करत असल्याचे सांगितले. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर नवीन कार्यकारिणी नियुक्त करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.













