मुंबई : शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यानंतर मोठी वाताहात झाली आहे. एकीकडे शिंदे गट शिवसेनेचं चिन्ह मिळवण्यासाठी धडपड करत आहे. तर दुसरीकडे, आता निवडणुकीतही उभे ठाकण्याच्या तयारीत आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये शिवसेना आणि शिंदे गट आमनेसामने येण्याची शक्यता आहे.
अंधेरी पूर्व मतदारसंघामध्ये शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झालं आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच शिंदे गट विरुद्ध शिवसेनेचा थेट सामना होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत रमेश लटके यांच्या मृत्यूने रिक्त झालेल्या अंधेरी पूर्वच्या विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे.
ही जागा भाजप शिंदे गटाला सोडणार असल्याची चर्चा आहे. तसेच, इथून मुरजी पटेलांचं नावही चर्चेत आहे. असं झालं तर या निवडणुकीच्या निमित्तानं प्रथमच शिवसेना आणि शिंदे गटाचा थेट सामना होऊ शकतो. मध्यंतरी औरंगाबादमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिंदे गटाने जास्त जागा जिंकून मुसंडी मारली होती.